तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई मुंबईतील 3 प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने रद्द, FDAचा दणका

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई मुंबईतील 3 प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने रद्द, FDAचा दणका
FDA संचालक तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर कठोर कारवाई करण्यात आली. नियमभंग आणि अस्वच्छतेमुळे परवाने रद्द, तर अमरावतीतील हॉटेलला बंदचे आदेश.
पुणे १५ जुलै २०२६ : अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला असून, त्याचाच भाग म्हणून मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच अमरावतीतील विनापरवाना सुरू असलेल्या एका हॉटेललाही व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील शालिमार हॉस्पिटॅलिटी या हॉटेलची तपासणी करताना अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. यापूर्वी प्रशासनाने सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या पुनर्तपासणीत तब्बल 25 त्रुटी कायम असल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याने संबंधित हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भेंडी बाजारातीलच नूर मोहम्मदी हॉटेलमध्येही FDA च्या तपासणीत अनेक गंभीर अनियमितता समोर आल्या. स्वयंपाकघरात स्वच्छतेचा अभाव, जमिनीवर साचलेले तेल, कीटकांचा वावर, अस्वच्छ पद्धतीने कच्च्या मालाची साठवणूक, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसणे आणि कीटक नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा नसल्याचे आढळले. या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे प्रशासनाने नमूद केले.
तिसरी कारवाई उमरखाडी येथील रहमानिया रेस्टॉरंटवर करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थ, रसायने आणि पॅकेजिंग साहित्याची योग्य साठवणूक नसल्याचे दिसून आले. तसेच गंजलेल्या उपकरणांचा वापर, कीटकप्रतिबंधक व्यवस्था नसणे, भिंती आणि छताची खराब अवस्था, तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्यांच्या नोंदी नसल्याचेही स्पष्ट झाले. या सर्व बाबी लक्षात घेऊन संबंधित आस्थापनाविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.
मुंबईबाहेर अमरावतीतील शेगाव नाका परिसरातील अमरावती दरबार या हॉटेलवरही FDA ने कारवाई केली आहे. तपासणीत हे हॉटेल वैध अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित व्यवस्थापनाला तातडीने व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून आवश्यक परवाना मिळेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
FDA ने स्पष्ट केले आहे की, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापनांवर भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसाय चालवणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा परवाना निलंबन किंवा रद्द करण्यासारखी कठोर कारवाई होऊ शकते.
या धडक मोहिमेमुळे राज्यातील खाद्य व्यवसायांमध्ये खळबळ उडाली असून, अनेक आस्थापनांनी स्वच्छता आणि नियमपालनाबाबत आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचेही सांगितले जात आहे.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare