मुंबईत धार्मिक श्रद्धेचा गैरवापर; पैगंबरांचा वंशज असल्याचा दावा करून ११ लाखांचे दागिने लंपास

0
मुंबईत धार्मिक श्रद्धेचा गैरवापर; पैगंबरांचा वंशज असल्याचा दावा करून ११ लाखांचे दागिने लंपास

मुंबईत धार्मिक श्रद्धेचा गैरवापर; पैगंबरांचा वंशज असल्याचा दावा करून ११ लाखांचे दागिने लंपास

मुंबईतील माहिममध्ये ‘पैगंबरांचा वंशज’ असल्याचे भासवून कुटुंबाची ११ लाखांची फसवणूक. आरोपी कादरी काचेच्या डबीत पवित्र केस असल्याचे सांगत महिलांकडून दागिने घेऊन फरार.

सायली मेमाणे

पुणे २६ नोव्हेंबर २०२५ : मुंबईतील माहिम परिसरात धार्मिक श्रद्धेचा गैरवापर करून तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘मी पैगंबर मोहम्मद यांचा वंशज आहे’ असा दावा करत एका कादरी नावाच्या व्यक्तीने कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याच्या आमिषाने महिलांकडून दागिने घेत पळ काढला. या प्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील अन्सार अहमद अब्दुल गनी यांनी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण फसवणुकीची सुरुवात २०२२ मध्ये झाली, जेव्हा अन्सार आणि त्यांचा भाऊ इसरार फारुकी यांची दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यामध्ये कादरीशी भेट झाली. तेव्हा कादरीने स्वतःला पैगंबर मोहम्मद यांचा वंशज असल्याचे सांगून आपल्या जवळ पैगंबरांचे पवित्र केस आहेत, असा दावा केला. त्याच्या या बोलण्यावर दोन्ही भावांचा विश्वास बसला आणि तेथून त्याच्याशी ओळख वाढत गेली.

काही दिवसांनी कादरी माहिममधील त्यांच्या घरीही आला. तो एका काचेच्या डबीत एक केस घेऊन आला आणि तो पैगंबरांचा पवित्र केस असल्याचे सांगितले. त्याने घरात काही धार्मिक विधी केले आणि ती डबी कपाटात सुरक्षित ठेवण्यास सांगितले. डबी उघडू नका किंवा हालवू नका, तोपर्यंत मी सांगत नाही, असे सांगून त्याने कुटुंबाचा विश्वास अधिक दृढ केला.

यानंतर, दोन्ही भाऊ घराबाहेर असताना कादरी पुन्हा घरी आला. त्याने भावांच्या पत्नींना सांगितले की, दागिने त्या पवित्र डबीजवळ ठेवले तर ते दुप्पट होतील आणि घरात प्रचंड पैसा वाढेल. धार्मिक भावना, श्रद्धा आणि आर्थिक लाभाच्या आशेने महिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि सुमारे ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने कपाटात ठेवले.

महिलांना काही वेळ बाहेर जाऊन येण्यास सांगितल्यानंतर कादरीने संधीचा फायदा घेत कपाटातील सर्व दागिने घेतले आणि पळ काढला. काही दिवसांनंतर महिलांनी ही गोष्ट आपल्या पतींना सांगितली तेव्हा फसवणुकीचा संपूर्ण धक्कादायक तपशील समोर आला. त्यानंतर कुटुंबाने तात्काळ माहिम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक, धार्मिक भावनांचा गैरवापर आणि विश्वासघाताच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कादरी फरार असून त्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्याचे संपर्क, ठिकाणे आणि जुन्या ओळखींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ही घटना धार्मिक श्रद्धा आणि आस्थेचा वापर करून आर्थिक फायदा घेण्याच्या गंभीर प्रकारांपैकी एक मानली जात आहे. नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. धार्मिक भावना आणि विश्वासाचा गैरवापर करून होणाऱ्या अशा फसवणुकीच्या प्रकरणांनी मुंबईत पुन्हा चिंता वाढली आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed