वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावस्कर यांच्या सन्मानार्थ खास संग्रहालय; MCA ची ऐतिहासिक घोषणा

0
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावस्कर यांच्या सन्मानार्थ खास संग्रहालय

वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावस्कर यांच्या सन्मानार्थ खास संग्रहालय

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ‘एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय’ उभारले जाणार आहे. सुनील गावस्कर व शरद पवार यांचा पुतळा येथे ठेवण्यात येणार असून क्रिकेटप्रेमींना ऐतिहासिक क्षणांचा आनंद मिळणार आहे.

सायली मेमाणे

पुणे १ ऑगस्ट २०२५ : मुंबईच्या क्रिकेटप्रेमींना आनंद देणारी आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवीन पर्वाची नोंद करणारी मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने जाहीर केले आहे की मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये एक खास क्रिकेट संग्रहालय उभारण्यात येणार आहे आणि त्यात भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा पुतळा लावण्यात येणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर ‘लिटिल मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे गावस्कर यांनी आपल्या अप्रतिम फलंदाजीने संपूर्ण जगभरात नाव कमावले असून त्यांच्या योगदानाला हा एक खास मानाचा मुजरा मानला जात आहे.

या संग्रहालयाचे नाव ‘एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय’ असे ठेवण्यात आले आहे आणि याचे उद्घाटन जुलै महिन्याच्या उत्तरार्धात होणार असल्याचे एमसीएने स्पष्ट केले आहे. या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर गावस्कर यांचा पुतळा ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआय आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा पुतळाही याठिकाणी असणार आहे. क्रिकेटच्या क्षेत्रात दोघांनी दिलेले योगदान हे या सन्मानाचे खरे हकदार असल्याचे सांगितले जात आहे.

या सन्मानाबद्दल बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “माझा पुतळा वानखेडे स्टेडियमच्या नव्या एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात ठेवण्याचा निर्णय झाल्याने मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटत आहे. मी नेहमीच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऋणी राहीन कारण त्यांच्यामुळेच माझे क्रिकेटमधले पहिले पाऊल पडले आणि नंतर मला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली.”

सुनील गावस्कर यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास त्यांच्या क्रिकेटमधील कर्तृत्वाची झलक दिसते. त्यांनी 1971 ते 1987 दरम्यान भारतासाठी 125 कसोटी सामने खेळून 51.12 च्या सरासरीने 10,122 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर 34 शतके आणि 45 अर्धशतके आहेत, तर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 236* आहे. एकदिवसीय सामन्यांतही त्यांनी 108 सामन्यांत 35.13 च्या सरासरीने 3,092 धावा केल्या असून, यात एक शतक आणि 27 अर्धशतके समाविष्ट आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 103* आहे.

या ऐतिहासिक संग्रहालयामुळे मुंबईतील क्रिकेट संस्कृतीला एक नवीन ओळख मिळणार असून, नव्या पिढीला भारताच्या क्रिकेट परंपरेचा थेट अनुभव घेता येणार आहे. सुनील गावस्कर यांच्यासारख्या दिग्गजाला दिलेला हा सन्मान म्हणजे भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली वारशाला दिलेले अभिवादनच म्हणता येईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed