सह्याद्री रुग्णालयातील दांपत्य मृत्यूप्रकरणी आरोग्य यंत्रणांचे हात वर; चौकशीची जबाबदारी टोलवाटोलवीत

0
सह्याद्री रुग्णालयातील दांपत्य मृत्यूप्रकरणी आरोग्य यंत्रणांचे हात वर; चौकशीची जबाबदारी टोलवाटोलवीत

सह्याद्री रुग्णालयातील दांपत्य मृत्यूप्रकरणी आरोग्य यंत्रणांचे हात वर; चौकशीची जबाबदारी टोलवाटोलवीत

सह्याद्री रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपणानंतर दांपत्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोग्य यंत्रणांमध्ये जबाबदारी टोलवाटोलवी सुरू आहे. राज्य आरोग्य विभागाने प्रकरण राज्य सल्लागार समितीकडे पाठवले असून ससून रुग्णालयाने तज्ज्ञ नसल्याचे कारण दिले. नातेवाइकांकडून चौकशीतील विलंबावर नाराजी.

सायली मेमाणे

पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : पुणे : सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर कोमकर दांपत्याचा मृत्यू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला असतानाही या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहेत. राज्य आरोग्य विभाग आणि ससून रुग्णालय प्रशासन एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असून चौकशी अंतिम टप्प्यात जाण्याऐवजी अधिकच विलंब होत आहे. दरम्यान, नातेवाइकांनी या ढिलाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ऑगस्ट महिन्यात घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवली होती. बापू कोमकर यांचा १५ ऑगस्ट रोजी डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर काही तासांतच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांनी पतीसाठी यकृताचा तुकडा दान केला होता. परंतु फक्त सात दिवसांनंतर, २२ ऑगस्ट रोजी कामिनी यांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे, कामिनी कोमकर यांना कोणत्याही सहव्याधी नव्हत्या, त्यामुळे मृत्यूचे कारण अधिकच गूढ बनले.

या घटनेनंतर आरोग्य विभागाने स्वतःहून चौकशी सुरू केली आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह एक उच्चस्तरीय समिती नेमली. मात्र, अनेक बैठकांनंतरही या समितीने कोणतेही स्पष्ट मत देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे प्रकरणाची दिशा अनिश्चित राहिली आहे. राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या दृकश्राव्य परिषदेत या प्रकरणाची चौकशी राज्य सल्लागार समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या राज्य सल्लागार समितीत आरोग्य सचिव, राज्य आणि राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे सदस्य, कायदेतज्ज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ अशा १६ सदस्यांचा समावेश आहे. समितीच्या शिफारशींनुसार पुढील कारवाई होणार आहे, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली. तथापि, ससून रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणातील जबाबदारीपासून स्वतःला दूर ठेवत, “आमच्याकडे यकृततज्ज्ञ किंवा पोटविकारतज्ज्ञ उपलब्ध नाहीत,” असे कारण देऊन चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यास नकार दिला आहे. त्यांनी हे प्रकरण दुसऱ्या रुग्णालयाकडे पाठविण्याचा प्रस्ताव डेक्कन पोलिसांना दिला आहे.

डेक्कन पोलिसांनी नातेवाइकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, आरोग्य यंत्रणांच्या परस्पर टोलवाटोलवीमुळे चौकशीतील गती मंदावली आहे. नातेवाइकांनी या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, “दोन जिवांचा बळी गेला आहे, पण अजून कोणावरही जबाबदारी निश्चित होत नाही,” असे म्हणत न्यायाची मागणी केली आहे.

या घटनेने राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांचा अभाव, जबाबदारी निश्चित करण्यात आलेला विलंब आणि संस्थांमधील समन्वयाचा अभाव या तिन्ही कारणांनी प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे. आता राज्य सल्लागार समितीच्या चौकशी अहवालानंतरच मृत्यूप्रकरणाचा खरा उलगडा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed