स्कूल बससाठी नवे नियम लागू 20 वर्षांपर्यंत परवाना, चालक-अटेंडंट पडताळणी बंधनकारक

स्कूल बससाठी नवे नियम लागू 20 वर्षांपर्यंत परवाना, चालक-अटेंडंट पडताळणी बंधनकारक
राज्य सरकारने स्कूल बस आणि व्हॅनसाठी नवी नियमावली लागू केली आहे. आता बसचे आयुर्मान 20 वर्षांपर्यंत वाढवले असून चालक-अटेंडंटची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.
पुणे २० जुलै २०२६ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत राज्य सरकारने स्कूल बस आणि विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांमुळे स्कूल बस चालक, मालक आणि शाळा प्रशासनासाठी सुरक्षा निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत. मुंबई वगळता राज्यातील स्कूल बस आणि व्हॅनच्या परवाना आयुर्मानात वाढ करण्यात आली असून, आता ही मर्यादा 15 वर्षांवरून 20 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे दैनंदिन अंतर इतर सार्वजनिक वाहनांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे स्कूल बसचे आयुर्मान वाढविण्याची मागणी विद्यार्थी वाहतूक संघटनांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य करत वाहनधारकांना दिलासा दिला आहे. मात्र, यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत.
नवीन नियमांनुसार प्रत्येक स्कूल बस चालक आणि अटेंडंटसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. संबंधित शाळा किंवा विद्यार्थी वाहतूक कंत्राटदारांना चालक आणि अटेंडंटची संपूर्ण माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) सादर करावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे.
याशिवाय स्कूल बसच्या प्रत्येक फेरीची, वेळापत्रकाची आणि वाहनाने पार केलेल्या अंतराची नियमित नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती आरटीओकडे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे बसच्या वापरावर आणि वाहतूक व्यवस्थेवर देखरेख ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
विद्यार्थी वाहतुकीच्या शुल्काबाबतही नव्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. स्कूल बस आणि व्हॅनचे भाडे निश्चित करण्याचे अधिकार आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे (आरटीए) देण्यात आले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे दर ठरवले जाणार आहेत. मात्र, पालकांकडून आकारण्यात येणाऱ्या वाहतूक शुल्काबाबत अधिक स्पष्ट धोरणाची गरज असल्याचे विद्यार्थी वाहतूक संघटनांचे मत आहे.
स्कूल बसचे आयुर्मान 20 वर्षांपर्यंत वाढवल्यामुळे वाहन मालकांना आर्थिक फायदा होणार आहे. जुन्या वाहनांवरील खर्चाचा भार कमी होणार असून वाहतूक व्यवसायाला स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वाहनांची योग्य देखभाल आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
माजी सदस्य, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण डॉ. बाबा शिंदे यांनी सांगितले की, स्कूल बसचे आयुर्मान वाढविण्याचा निर्णय वाहनधारकांसाठी दिलासादायक आहे. मात्र, अवैध विद्यार्थी वाहतुकीवर प्रभावी कारवाई करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी वाहतूक संघटना, पुणे शहरचे अध्यक्ष बापू भावे यांनीही शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्कूल बसचे आयुर्मान वाढविण्यासाठी संघटनेने दीर्घकाळ पाठपुरावा केला होता. मात्र, काही अटी व्यवहार्य नसल्याने त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकांनी आपल्या मुलांना ज्या स्कूल बसमधून पाठवले जाते त्या वाहनाचा परवाना, चालक-अटेंडंटची पडताळणी, सीसीटीव्ही, जीपीएस सुविधा, अग्निशमन उपकरणे तसेच फिटनेस आणि विमा कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे. नवीन नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare