अहिल्यानगर: जातीय वैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला, 11 जणांविरोधात गुन्हा

अहिल्यानगर: जातीय वैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला, 11 जणांविरोधात गुन्हा
नेवासा तालुक्यातील सोनई गावात जातीय वैमनस्यातून नितीन वैरागर याच्यावर निर्दय हल्ला; आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईसह गुन्हा दाखल, वंचित बहुजन आघाडीची तातडीची मागणी.
सायली मेमाणे
पुणे २४ ऑक्टोबर २०२५ : अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावात जातीय वैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुण नितीन संजय वैरागर याच्यावर आरोपींनी जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी निर्दय मारहाण केली. मारहाणीदरम्यान जातीयवाचक शिवीगाळही करण्यात आली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, स्थानिक समाजात या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या नितीन वैरागर याच्यावर सध्या अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात 11 आरोपींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये संभाजी लांडे, संदीप लांडे, राजू मोहिते, गणेश चव्हाण, विशाल वने, महेश दरंदले, शुभम मोरे, अक्षय शेटे, नितीन शिंदे, स्वप्निल भळगट, हासणे आदींचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “ही अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारी घटना आहे. पीडित तरुणाला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जावी, तसेच पीडित कुटुंबियांसोबत वंचित बहुजन आघाडी उभी आहे.”
प्रकाश आंबेडकर यांनी पीडित तरुणाच्या वडिलांशी फोनवर संवाद साधल्याचे सांगितले असून, आरोपींविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे.
या प्रकारामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील जातीय संवेदनशीलतेवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात तातडीने तपास सुरू केला असून, पीडित तरुणाच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था केल्याचे सांगितले आहे.
अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करून सामाजिक एकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज स्थानिक प्रशासनाने अधोरेखित केली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter