एकनाथ शिंदे गटाला रायगडमध्ये मोठा धक्का; सुनील तटकरे यांची खेळी, भरत गोगावले यांच्या गोटातील कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
एकनाथ शिंदे गटाला रायगडमध्ये मोठा धक्का; सुनील तटकरे यांची खेळी, भरत गोगावले यांच्या गोटातील कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ शिंदे गटाला रायगडमध्ये मोठा धक्का; सुनील तटकरे यांची खेळी, भरत गोगावले यांच्या गोटातील कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला मोठा धक्का दिला आहे. आगामी स्थानिक निवडणुकांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय चढाओढ अधिक तीव्र झाली आहे.

सायली मेमाणे

पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हलचल पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यातील सत्तासंघर्ष तीव्र होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का दिला आहे. गोगावले यांच्या जवळच्या सहकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिंदे गटाची डोकेदुखी वाढवली आहे.

मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांचे निकटवर्तीय आणि युवा उद्योजक सुशांत जाबरे यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा महाड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तसेच स्नेहल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशामुळे महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुशांत जाबरे यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा प्रवेश केवळ राजकीय नाही, तर निवडणूकपूर्व रणनीतीचा एक भाग असल्याचं स्पष्ट होतं. तटकरे यांनी यावेळी नव्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक विचारधारेचा परिचय करून दिला आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं.

सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “आज महाड येथे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. श्री. सुशांत जाबरे, हनीफभाई वसघरे, अनिश पठाण, सत्यवान यादव, समीर रेवाळे, संतोष धारशे आणि विठ्ठल घरटकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेने प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केला.”

त्यांनी पुढे सांगितलं की, “नव्याने पक्षात सामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक वाटचालीसाठी पूर्ण पाठिंबा देऊ. एखादा तरुण कार्यकर्ता जेव्हा समाजकारणात उतरतो, तेव्हा त्याला प्रेरणा, आत्मविश्वास आणि धैर्याची गरज असते. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

या घडामोडीनंतर रायगडमधील शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यातील हा धक्का मोठा राजकीय संकेत देतो आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली ही हालचाल शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी आपले बालेकिल्ले मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पक्षांतरामुळे रायगडमधील राजकीय लढतीचा रंग अजून गडद झाला असून, स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता वाढली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed