कर्जतमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या; ५ दिवसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढत भयाण सत्य उघड

कर्जतमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या; ५ दिवसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढत भयाण सत्य उघड
कर्जतच्या कुरकुलवाडीत शेजारी महिलेकडून अडीच वर्षांच्या चिमुरड्याची हत्या. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू म्हटले, पण गुप्त माहितीवर ५ दिवसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनात खळबळजनक खुलासा.
सायली मेमाणे
१६ नोव्हेंबर २०२५ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या शांत परिसरात अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या निघृण हत्येने सर्वांचे मन सुन्न झाले आहे. खेळता खेळता मृत्यू झाल्याचे भासवण्यात आलेल्या या बाळाच्या मृत्यूमागे थरकाप उडवणारे सत्य दडलेले होते. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या जयवंता गुरुनाथ मुकणे हिला पोलिसांनी अटक केली असून तिने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे कर्जत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
मृत चिमुरड्याचे नाव जयदीप गणेश वाघ असून तो फक्त अडीच वर्षांचा होता. ९ नोव्हेंबर रोजी जयदीपचे आई-वडील गणेश वाघ आणि पत्नी पुष्पा मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरासमोर दोन्ही मुले खेळत असताना शेजारी राहणारी जयवंता हिने अचानक जयदीपला उचलून मागच्या बाजूस नेले आणि गळा आवळून त्याची हत्या केली. या नंतर तिने मुलगा अचानक बेशुद्ध पडल्याचा बनाव रचला आणि नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सर्वांना पटवण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनीही बाळ मृत असल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी कोणताही संशय न घेतल्याने त्याच्याच दिवशी अंत्यसंस्कारही पार पडले.
परंतु काही दिवसांनी एका नागरिकाने पोलिसांकडे गुप्त माहिती दिल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक वळण बाहेर आले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून चिमुरड्याचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. पोस्टमार्टम अहवालात बाळाची हत्या गळा आवळून केल्याचे स्पष्ट झाले. हा निष्कर्ष आल्यानंतर आरोपी जयवंताला अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान तिने धक्कादायक कबुली दिली की, शेजारची मुले माझ्या मुलांना मारतात म्हणून रागातून मी जयदीपला मारले. एवढेच नव्हे, तर घटना घडण्याच्या आदल्या दिवशी तिने जयदीपच्या चार वर्षांच्या बहिणीला मारण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र तो अपयशी ठरल्याने दुसऱ्या दिवशी तिने अडीच वर्षांच्या या निरागस बाळाचा जीव घेतला.
या भयावह प्रकरणामुळे संपूर्ण कर्जत परिसर हादरला आहे. खेळणाऱ्या मुलांचा आवाज थांबलेल्या वातावरणात आता भीती आणि वेदनांचे सावट पसरले आहे. एका निष्पाप बाळाचा जीव गेलेला पाहून नागरिकांनी वेळेत पोलिसांत तक्रार न जाण्याचे दु:ख व्यक्त केले असून अशा मानसिक विकृत प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहनही होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू केला असून आरोपीवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे.
ही घटना समाजाला पुन्हा एकदा जाग आणणारी आहे. शेजारी-पाजारी भांडणे, किरकोळ वाद आणि राग यामधून कशा प्रकारे निरपराध मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतात याचा विचार करण्याची वेळ या प्रकरणातून पुन्हा एकदा आली आहे. बाळाच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून न्याय मिळावा, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter