ठाण्यात पैसा डबलचा गंडा! खेळण्याच्या नोटा आणि खोटे सोने वापरून फसवणूक; एक अटकेत, साथीदार फरार

ठाण्यात पैसा डबलचा गंडा! खेळण्याच्या नोटा आणि खोटे सोने वापरून फसवणूक; एक अटकेत, साथीदार फरार
ठाण्यात जलद नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पोलिसांनी खेळण्यातील नोटा, खोटे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त केला; एक आरोपी अटकेत, साथीदार फरार.
सायली मेमाणे
८ ऑक्टोबर २०२५ : ठाण्यात जलद नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कापुरबावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. “तीन आठवड्यांत पैसा डबल” अशा बनावट आश्वासनांवर विश्वास बसवून लोकांना मोठ्या रकमेचा गंडा घातला जात होता. या कारवाईत एक आरोपी अटकेत असून त्याचा साथीदार संधी साधून पसार झाला आहे. या टोळीने खेळण्यातील नोटा, खोटे सोने आणि इतर बनावट माल वापरून फसवणुकीची मालिका राबवली होती.
फिर्यादी नितेश हरिश्चंद्र शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका इसमाने त्यांना १ लाख रुपये दिल्यास केवळ तीन आठवड्यांत ३ लाख रुपये परत देण्याचे आमिष दाखवले. व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीवरून कापुरबावडी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासात पुढे जात पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी मोठ्या प्रमाणात खेळण्यातील नोटा घेऊन व्यवहारासाठी येणार आहे. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता ग्लोबल हॉस्पिटलजवळ, साकेत–बाळकुम रोड परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी फिर्यादींना खऱ्या नोटांच्या बदल्यात खेळण्याच्या नोटांचा बंडल देत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. त्याचा साथीदार मात्र गोंधळात पळून जाण्यात यशस्वी झाला.
अटक आरोपीकडून आणि त्याच्या घराच्या झडतीत मोठ्या प्रमाणात बनावट माल जप्त करण्यात आला. यामध्ये “भारतीय बच्चो का बँक” असे लिहिलेल्या ५०० रुपयांच्या खेळण्यातील नोटांचे एकूण ३६० बंडल, सोन्यासारखी दिसणारी ३८ पिवळ्या धातूची बिस्कीटे, तसेच काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या बंडलांमध्ये वर–खाली दोन प्रत्यक्ष नोटा ठेवून संपूर्ण बंडल खऱ्या नोटांचा आहे असा भास निर्माण केला जात होता.
अटक आरोपीची ओळख संजयकुमार पकौडीलाल भारती (वय ४३, रा. भिवंडी) अशी झाली असून तो नोकरी करणारा असल्याचे सांगितले जाते. प्राथमिक तपासात उघड झाले आहे की आरोपी आणि त्याचा साथीदार नागरिकांना कमी मुदतीत अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. विश्वासात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली जात असे आणि बदल्यात खेळण्यातील नोटा पुष्कळ प्रमाणात दिल्या जात होत्या.
फक्त नोटांच्या बंडलांनीच नव्हे तर “स्वस्तात सोने” देण्याच्या नावाखालीही ही टोळी लोकांना फसवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सोन्यासारखी दिसणारी धातूची बिस्कीटे देऊन अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपीच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक कार्यरत आहे.
या प्रकरणामुळे जलद नफा, पैसा डबल योजना आणि गुंतवणुकीच्या खोट्या आश्वासनांबाबत नागरिक अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांनीही नागरिकांना विनंती केली आहे की संशयास्पद आर्थिक व्यवहार त्वरित पोलिसांना कळवावे आणि अपरिचित लोकांकडून नफा देण्याच्या आमिषांना बळी पडू नये.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter