दुचाकी वाहनांवर टोल नाही – नितीन गडकरींनी दिला स्पष्ट संदेश
नितीन गडकरींनी दिला स्पष्ट संदेश
दुचाकी वाहनांवर टोल लागणार असल्याच्या अफवांवर नितीन गडकरींनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका, दुचाकींना सूट कायम राहील.
सायली मेमाणे
२६ जून २०२५ : देशभरात १५ जुलैपासून दुचाकी वाहनांवर टोल आकारला जाणार असल्याच्या अफवांमुळे वाहनचालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सोशल मीडियावर या संदर्भातील अनेक भ्रामक पोस्ट्स व्हायरल झाल्या. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्व अफवांचं पूर्ण खंडन केलं आहे. त्यांनी २६ जून रोजी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (म्हणजेच पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत सांगितले की, “दुचाकी वाहनांवर टोल लावण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही.” त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
गडकरी यांनी हे देखील स्पष्ट केलं की, प्रत्येक दुचाकी वाहनाच्या विक्रीवेळी एक निश्चित टोल आधीच आकारला जातो, त्यामुळे वाहनचालकांना टोल प्लाझावर दुबार टोल भरावा लागत नाही. सध्या केवळ चारचाकी आणि त्याहून मोठ्या वाहनांकरताच राष्ट्रीय महामार्गांवर टोल आकारला जातो. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांना कोणतीही नवी अडचण येणार नाही.
दरम्यान, गडकरींनी एका नव्या टोल योजनेची घोषणाही केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून ‘फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास’ योजना लागू होणार असून या योजनेअंतर्गत वाहनचालकांना ३,००० रुपये भरून वर्षभरात २०० वेळा NHAI आणि नॅशनल एक्सप्रेसवे टोल प्लाझांवर प्रवास करता येईल. ही योजना सध्या केवळ राष्ट्रीय महामार्गांपुरती मर्यादित असेल आणि राज्य महामार्गांवर ती लागू होणार नाही.
या योजनेमुळे ६० किमीच्या परिघात एकापेक्षा अधिक टोल प्लाझा असलेल्या भागांत नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल, तसंच टोल देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. गडकरी म्हणाले की, यामुळे टोल प्लाझांवरील गर्दीही कमी होईल आणि वाद निर्माण होण्याचं प्रमाणही घटेल. एकूणच दुचाकी वाहनांवरील टोल संदर्भातील सर्व अफवा चुकीच्या असून, त्यांच्यासाठी पूर्वीप्रमाणेच सूट कायम राहणार आहे.
सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यास, अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहावं आणि केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन गडकरी यांनी केलं आहे.