दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द नगरसेवकपद धोक्यात, आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का

0
दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द नगरसेवकपद धोक्यात, आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का

दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द नगरसेवकपद धोक्यात, आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का

दौंड नगर परिषदेचे नगरसेवक रोहित पाटील यांचे कुणबी (OBC) प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले असून आमदार राहुल कुल आणि माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.


पुणे १७ जून २०२६ : पुणे : दौंड नगर परिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांचे कुणबी (ओबीसी) जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले असून, दौंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे दौंडचे आमदार राहुल कुल तसेच माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या राजकीय गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रोहित पाटील यांनी नागरिक हित संरक्षण मंडळ व भाजप विकास आघाडीच्या माध्यमातून दौंड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) आरक्षित जागेवरून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

रतन सुमंत जाधव, सुशांत सुरेश वाघमारे, सचिन शिवाजी कुलथे, मृणाल ढोले पाटील आणि अनिकेत विजय भागवत यांनी रोहित पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर अंतिम सुनावणी झाल्यानंतर समितीने सादर केलेल्या पुराव्यांची सखोल तपासणी केली आणि महत्त्वाच्या विसंगती आढळल्याने त्यांचा कुणबी जातीचा दावा फेटाळून लावला.

समितीने आपल्या निर्णयात नमूद केले की, रोहित पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये वेगवेगळ्या वंशावळी नमूद करण्यात आल्या होत्या. तसेच रक्ताच्या नातेसंबंधांचे विश्वसनीय दस्तऐवजी पुरावे, महसूल नोंदी आणि शालेय दाखल्यांमध्ये आवश्यक सुसंगती आढळली नाही. केवळ ‘पाटील’ हे समान आडनाव आणि काही स्थानिक नागरिकांची प्रतिज्ञापत्रे यांच्या आधारे कुणबी समाजाचा दावा ग्राह्य धरता येणार नाही, असे समितीने स्पष्ट केले.

संताजी पाटील आणि श्रीपती पाटील यांच्याशी रक्ताचे नाते सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज सादर करण्यात आले नसल्याचेही समितीने नमूद केले आहे. त्यामुळे रोहित पाटील यांचा कुणबी समाजातील असल्याचा दावा सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष अमोल यादव, सदस्य सचिव शिवकांत चिकूर्ते आणि सदस्य संजय दाणे यांनी हा निर्णय दिला.

हे प्रकरण १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दौंड नगर परिषदेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जात पडताळणीसाठी समितीकडे पाठवले होते. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सर्व कागदपत्रांची तपासणी आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समितीने अखेर रोहित पाटील यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले.

या निर्णयामुळे आता रोहित पाटील यांच्या नगरसेवकपदावर कायदेशीर संकट निर्माण झाले आहे. कारण आरक्षित जागेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्याच्या सदस्यत्वावर परिणाम होऊ शकतो. या प्रकरणात पुढे न्यायालयीन लढाई होण्याचीही शक्यता वर्तवली जात असून, दौंडच्या स्थानिक राजकारणात या निर्णयाचे मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed