पनवेल निवडणूक वाद | 11 हजार मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा बाळाराम पाटील यांचा दावा
पनवेल निवडणूक वाद | 11 हजार मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा बाळाराम पाटील यांचा दावा
पनवेल विधानसभा निवडणुकीत 11,600 मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा शेकाप नेते बाळाराम पाटील यांचा आरोप; 85 हजारांहून अधिक दुबार नावे मतदारयादीत असल्याचा दावा. निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले.
सायली मेमाणे
पुणे २८ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर पुन्हा एकदा मतदारयादीतील गोंधळाचा आरोप होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयादीतील घोळाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, पनवेल विधानसभा मतदारसंघात तब्बल 11 हजार 600 मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा दावा माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते बाळाराम पाटील यांनी केला आहे.
बाळाराम पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, “राहुल गांधी यांनी मतचोरीच्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे पनवेल मतदारसंघ. येथे मोठ्या प्रमाणात दुबार नावे आहेत आणि त्यामुळे दोनदा मतदान झाले.”
पाटील यांच्या म्हणण्यानुसार, पनवेल मतदारसंघाच्या यादीत एकूण 85,211 मतदारांची पुनरुक्ती दिसून आली. त्यात 25,855 मतदारांची नावे दोनदा पनवेलमध्येच नोंदवली गेली आहेत. पनवेल-उरण मध्ये 27,275, पनवेल-ऐरोली मध्ये 16,096, पनवेल-बेलापूर मध्ये 15,397 मतदारांची दुबार नावे असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 588 मतदारांची नावे पत्त्याशिवाय नोंदवली गेल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीदरम्यान बूथ एजंट्सकडे असलेल्या याद्यांच्या पडताळणीतून 11 हजार 600 मतदारांनी प्रत्यक्ष दोनदा मतदान केल्याचे लक्षात आले, असे पाटील यांनी सांगितले. त्यांचा आरोप आहे की “हे प्रकरण केवळ निष्काळजीपणामुळे नाही तर पद्धतशीरपणे घडवून आणले गेले आहे.”
यापूर्वीच त्यांनी 10 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून या नावांची दखल घेऊन ती वगळण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने नावे वगळण्याचे आदेश दिले असतानाही कार्यवाही झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.
पाटील यांनी पुढे सांगितले की, “मतदानाच्या रेकॉर्ड्सची अधिकृत पडताळणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु मतदान केलेल्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. आमच्या मते प्रत्यक्षात 22 ते 25 हजार मतदारांनी दोनदा मतदान केले असण्याची शक्यता आहे.”
पनवेल मतदारसंघातील मुख्य लढत भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर आणि शेकापचे बाळाराम पाटील यांच्यात झाली होती. यात प्रशांत ठाकूर यांनी तब्बल 51,091 मतांनी विजय मिळवला. तथापि, निवडणूक आयोगाने पाटील यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मतदारयादीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवडणुकीदरम्यान शेवटच्या तासाभरात अचानक वाढलेले मतदान, अल्पावधीत वाढलेली मतदारसंख्या आणि दुबार नावांच्या तक्रारींमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत अनेक शंका निर्माण होत आहेत.