पुणे खत घोटाळा उघड: युरिया साठ्यात तफावत १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
पुणे खत घोटाळा उघड: युरिया साठ्यात तफावत १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
पुणे जिल्ह्यात POS नोंदी आणि प्रत्यक्ष युरिया साठ्यात तफावत आढळल्याने कृषी विभागाची धडक कारवाई. दौंडसह १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; शेतकऱ्यांना खरेदी टाळण्याचे आवाहन.
पुणे २० एप्रिल २०२६ : पुणे जिल्ह्यात युरिया खताच्या साठ्याबाबत मोठी अनियमितता उघडकीस आली असून पॉस (POS) मशीनवरील नोंदी आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये लक्षणीय तफावत आढळल्याने कृषी विभागाने कडक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील तब्बल १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. १ एप्रिलपासून जिल्हाभर युरिया साठ्याची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान सुमारे ३५०० टन युरिया केवळ कागदोपत्री (POS प्रणालीत) शिल्लक दाखवला गेला असल्याचे समोर आले. प्रत्यक्षात हा साठा विक्री होऊनही प्रणालीतून कमी न केल्याने पुरवठा नियोजनात अडथळे निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले.
निलंबित केंद्रांमध्ये दौंड तालुक्यातील सर्वाधिक सात केंद्रांचा समावेश आहे. तसेच इंदापूर, जुन्नर, शिरूर, भोर आणि आंबेगाव तालुक्यांतील केंद्रांचाही समावेश आहे. या सर्व केंद्रांवर निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारच्या खत विक्रीस सक्त मनाई करण्यात आली आहे.
तालुकानिहाय निलंबित कृषी सेवा केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे आहे: दौंड तालुक्यात अदिती कृषी सेवा केंद्र (लिंगाळी), बळीराजा ॲग्रो एजन्सी (देऊळगाव राजे), शिवकृपा ॲग्रो एजन्सी (पिंपळगाव), नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस (नंदादेवी), बिरोबा कृषी सेवा केंद्र (बिरोबावाडी), श्रीराम कृषी भंडार (हिंगणी बेर्डे) आणि श्रीनाथ ॲग्रो सर्व्हिसेस (राहू). इंदापूरमध्ये महेश फर्टिलायझर (आगोती नं. १) आणि गणेश ॲग्रो एजन्सी (कळस), जुन्नरमध्ये विघ्नहर कृषी सेवा केंद्र (नारायणगाव) आणि कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी (जुन्नर), शिरूरमध्ये विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र (मांडवगण फराटा), भोरमध्ये श्री भैरवनाथ शेती भांडार (वेळू) आणि आंबेगावमध्ये शेतकरीराजा कृषी उद्योग (गावडेवाडी) यांचा समावेश आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, निलंबित केंद्रांकडून खते खरेदी करू नयेत. POS यंत्रणेवर साठा अद्ययावत न ठेवणे, विक्री झाल्यानंतरही नोंदी न करणे आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत ठेवणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खत उपलब्धतेबाबत चुकीचे चित्र तयार होत होते आणि पुरवठा साखळी विस्कळीत होत होती.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुढील काळातही अशी तपासणी मोहीम सातत्याने राबवली जाणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि काळाबाजार रोखावा, यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. या धडक कारवाईनंतर इतर कृषी सेवा केंद्रांनीही POS नोंदी आणि साठा यामध्ये सुसंगती ठेवण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील खत विक्री व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे पारदर्शकता वाढेल आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी खत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare