बारामतीत सुनेत्रा पवारांचा मॉर्निंग वॉक संवाद; “दादा शब्दाचे पक्के, कामाचे एक्के” म्हणत नागरिक भावुक

0
बारामतीत सुनेत्रा पवारांचा मॉर्निंग वॉक संवाद; “दादा शब्दाचे पक्के, कामाचे एक्के” म्हणत नागरिक भावुक

बारामतीत सुनेत्रा पवारांचा मॉर्निंग वॉक संवाद; “दादा शब्दाचे पक्के, कामाचे एक्के” म्हणत नागरिक भावुक

बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मॉर्निंग वॉकदरम्यान नागरिक, महिला सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अजित पवारांच्या कामाची आठवण काढत नागरिक भावुक झाले.

पुणे २० एप्रिल २०२६ : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी सकाळी शहरातील विविध ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेगळी दिशा दिली. जाहीर सभा आणि भाषणांपेक्षा प्रत्यक्ष गाठीभेटींना प्राधान्य देत त्यांनी नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि आठवणी ऐकून घेतल्या.

शहरातील सुशोभीकरण करण्यात आलेल्या निरा डावा कालव्याच्या भराव्यावरून चालत असताना त्यांनी वयोवृद्ध महिला, नियमित व्यायाम करणारे नागरिक आणि सफाई कर्मचारी महिलांशी संवाद साधला. चहाच्या कपासोबत झालेल्या या संवादात अनेकांनी बारामतीच्या विकासकामांचा उल्लेख करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढली. “दादा शब्दाचे पक्के तर कामाचे एक्के होते; दादांच्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतोय,” असे म्हणत काही नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

बारामती शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातही सुनेत्रा पवार यांनी भेट देत व्यायाम आणि खेळासाठी येणाऱ्या युवक-युवतींशी चर्चा केली. येथे एका नागरिकाने अजित पवारांच्या काम करण्याच्या पद्धतीचा उल्लेख करत, “त्यांची चाल, त्यांचा उत्साह आणि सातत्य आम्हाला प्रेरणा देणारे होते,” असे सांगितले. या आठवणींनी वातावरण भावूक झाले आणि उपस्थितांनी बारामतीच्या विकासासाठी सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रचाराचा केंद्रबिंदू म्हणून थेट नागरिकांशी संवाद साधण्याची रणनीती स्पष्टपणे दिसून आली. महिलांनी शहरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेबाबत समाधान व्यक्त करत पुढील काळातही हीच गती कायम ठेवावी, अशी अपेक्षा मांडली. सुनेत्रा पवार यांनी सर्वांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत पुढील कामकाजात त्यावर लक्ष देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, ग्रामीण भागात युवा नेते पार्थ पवार हे नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच, रोहित पवार आणि बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार हे देखील प्रचारात सक्रिय झाले आहेत. शरीर फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार या देखील दोन दिवसांपासून प्रचारात सहभागी झाल्या आहेत. या सर्वांच्या सहभागामुळे प्रचारयंत्रणा अधिक बळकट झाल्याचे दिसून येत आहे.

राजकीय पातळीवरही हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महायुतीची ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असल्याचे सांगत जोरदार प्रचाराचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरासह तालुक्यातील गावागावांत जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत.

या सर्व घडामोडींमध्ये बारामतीकरांच्या भावना ठळकपणे पुढे येताना दिसतात. अजित पवारांच्या कार्यकाळातील विकासकामांच्या आठवणी आणि त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा नागरिकांच्या शब्दांतून व्यक्त होत आहे. त्याच वेळी, सुनेत्रा पवार यांच्याकडून त्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मॉर्निंग वॉकदरम्यान झालेल्या या साध्या पण भावनिक संवादाने प्रचाराला मानवी स्पर्श मिळाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed