पुणे शहराचे प्रवेशद्वार पाण्याखाली! पवना-खडकवासला धरणातून विसर्ग, हॅरीस पुलाचा रस्ता बंद
पुणे शहराचे प्रवेशद्वार पाण्याखाली! पवना-खडकवासला धरणातून विसर्ग, हॅरीस पुलाचा रस्ता बंद
पुण्यात मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून बोपोडीतील हॅरीस पुलाचा रस्ता पाण्याखाली; वाहतूक बंद.
सायली मेमाणे
पुणे १२ जून २०२५ : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे मुळा आणि मुठा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे असलेले खडकवासला आणि पवना धरण भरू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. परिणामी नद्यांची पातळी वाढून काही सखल भाग जलमय झाले आहेत.
गुरुवारी रात्री पवना धरणातून पाणी सोडण्यात आले आणि त्याचा थेट परिणाम शहराच्या प्रवेशद्वारावर दिसून आला. बोपोडीतील हॅरीस पुलाखालून जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला. हा रस्ता पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, दरवर्षी पुरामुळे तो काही काळासाठी बंद केला जातो. यंदा जून महिन्यात पहिल्यांदाच या रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात आली. गुरुवारी रात्री ११.३० वाजता प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी याबाबत माहिती दिली.
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. विशेषतः पिंपरी चिंचवडहून येणाऱ्या वाहनचालकांसाठी पुणे विद्यापीठाकडे जाण्याचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र मुसळधार पावसामुळे नदीचे पात्र फुगले आणि हा रस्ता पाण्याखाली गेला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित ही कारवाई केली.
खडकवासला धरणातूनही गुरुवारी दुपारी १ वाजता २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. त्यानंतर विसर्ग वाढत ४ हजार आणि रात्री नऊ हजार क्युसेकपर्यंत पोहोचला. या पाण्यामुळे मुठा नदीच्या काठावरील वस्त्यांना धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही नागरिकाने नदीपात्रात उतरणे, जनावरे किंवा साहित्य ठेवणे टाळावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य पूरग्रस्त भागांतील नागरिकांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना दिले गेले आहेत.
गुरुवारी सकाळपासून शहरात पावसाचा जोर कायम होता. अनेक भागांत सखल रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ झाली. त्यामुळे ऑफिस, उद्योगधंद्यांकडे जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मध्यरात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता, आणि हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठीही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz
1 thought on “पुणे शहराचे प्रवेशद्वार पाण्याखाली! पवना-खडकवासला धरणातून विसर्ग, हॅरीस पुलाचा रस्ता बंद”