प्रज्ञानंदचा ऐतिहासिक पराक्रम! नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला, कार्लसेनलाही दोनदा दिली मात

प्रज्ञानंदचा ऐतिहासिक पराक्रम! नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला, कार्लसेनलाही दोनदा दिली मात
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. मॅग्नस कार्लसेनला दोनदा पराभूत करत तो ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
पुणे ०६ जून २०२६ : भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. अवघ्या 20 वर्षांच्या प्रज्ञानंदने ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरचा पराभव करत त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
ओस्लो येथे पार पडलेल्या या स्पर्धेत प्रज्ञानंदने सुरुवातीपासूनच दमदार खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात तो 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र निर्णायक सामन्यात व्हिन्सेंट केमरविरुद्ध क्लासिकल गेम जिंकून त्याने 3 महत्त्वाचे गुण मिळवले आणि एकूण 18 गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
स्पर्धेत अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो हा विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. अंतिम फेरीत त्याचा सामना अनिर्णित राहिल्याने निकाल आर्मागेडॉन टायब्रेकरवर गेला. टायब्रेकर जिंकूनही त्याला फक्त 1.5 गुण मिळाले. त्यामुळे त्याची एकूण गुणसंख्या 17 वर पोहोचली आणि प्रज्ञानंदने एका गुणाच्या फरकाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील सर्वात मोठी चर्चा ठरली ती प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसेनला दिलेल्या दोन पराभवांची. सात वेळा नॉर्वे चेस विजेता राहिलेल्या कार्लसेनला एका स्पर्धेत दोनदा हरवणे ही अत्यंत दुर्मिळ कामगिरी मानली जाते. प्रज्ञानंद हा असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 2007 मध्ये भारतीय बुद्धिबळाचे महानायक विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस स्पर्धेत कार्लसेनला दोनदा पराभूत केले होते.
स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रज्ञानंदची कामगिरी अपेक्षेप्रमाणे प्रभावी नव्हती. मात्र त्याने संयम राखत पुढील फेऱ्यांमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवत त्याने गुणतालिकेत झपाट्याने प्रगती केली आणि अखेर विजेतेपदावर नाव कोरले.
विशेष म्हणजे भारतीय बुद्धिबळातील दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश यांनाही नॉर्वे चेसचे विजेतेपद जिंकता आले नव्हते. 2013 पासून सुरू झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देण्याचा मान प्रज्ञानंदने मिळवला आहे.
फ्रान्सचा अलीरेझा फिरौजा 15.5 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला, तर मॅग्नस कार्लसेन 13 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश 8 गुणांसह सहाव्या आणि अखेरच्या स्थानावर राहिला.
प्रज्ञानंदच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतीय बुद्धिबळाला नवी उंची मिळाली आहे. आगामी काळात जागतिक बुद्धिबळ विश्वात भारताचे वर्चस्व आणखी मजबूत होण्याचे संकेत या विजयातून मिळत आहेत
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare