फुरसूंगी आणि वानवडीत बंद फ्लॅट फोडले; चोरट्यांनी १० लाखांचा ऐवज लंपास

0
फुरसूंगी आणि वानवडीत बंद फ्लॅट फोडले; चोरट्यांनी १० लाखांचा ऐवज लंपास

फुरसूंगी आणि वानवडीत बंद फ्लॅट फोडले; चोरट्यांनी १० लाखांचा ऐवज लंपास

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! फुरसूंगी व वानवडीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी १० लाखांचा ऐवज चोरला. गेल्या ३.५ वर्षांत पुण्यात तब्बल ७३ कोटींच्या घरफोड्या.

सायली मेमाणे

पुणे २९ ऑगस्ट २०२५ : पुण्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. फुरसूंगी आणि वानवडीत बंद फ्लॅट फोडून तब्बल १० लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सातत्याने होत असलेल्या घरफोड्यांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे.

फुरसूंगीत झालेल्या पहिल्या घटनेत, एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या बेडरूममधील स्लायडींग खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी मयुर अग्रवाल यांनी फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अग्रवाल हे उरुळी देवाची येथील रहिवासी असून, ते घराला कुलूप लावून गेल्यानंतर २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान ही घरफोडी घडली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत वानवडीतील घोरपडी येथील सोपानबाग परिसरातील एका सोसायटीत चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून ५ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी ७८ वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २१ ते २७ ऑगस्ट या दरम्यान घडली असल्याचे समोर आले आहे.

या दोन घटनांमुळे पुन्हा एकदा पुण्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात गेल्या काही वर्षांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल २ हजार बंद घरे फोडण्यात आली असून, चोरट्यांनी तब्बल ७३ कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवजच पोलिसांना परत मिळवता आला आहे. म्हणजेच बहुतांश प्रकरणांमध्ये चोरट्यांचा तपास लागलेलाच नाही.

पुणेकर पै-पै साठवून घरे उभारत असताना चोरटे त्यावर डल्ला मारून ‘करोडपती’ होत आहेत. घरफोड्या, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी आणि लुटमार यांसारख्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुणेकरांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच गडद होत आहे. नागरिक काही तासांसाठी जरी घराला कुलूप लावून बाहेर गेले तरी लगेचच चोरट्यांची नजर त्यावर जात असल्यासारखे प्रकार घडत आहेत.

सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या प्रतिमेला घरफोडीच्या घटनांनी मोठे गालबोट लागले आहे. दिवसाढवळ्या आणि रात्री देखील या घटना घडत असल्याने पुणेकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त आणि तपास वाढवून चोरट्यांना पकडणे आवश्यक असल्याची नागरिकांची मागणी होत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *