बारामती नगरपरिषदेला 1 कोटींची अत्याधुनिक सीवर मशीन ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ स्वच्छता व्यवस्थेचा नवा अध्याय

0
बारामती नगरपरिषदेला 1 कोटींची अत्याधुनिक सीवर मशीन ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ स्वच्छता व्यवस्थेचा नवा अध्याय

बारामती नगरपरिषदेला 1 कोटींची अत्याधुनिक सीवर मशीन ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ स्वच्छता व्यवस्थेचा नवा अध्याय

बारामती नगरपरिषदेला राज्य शासनाकडून 1 कोटी रुपयांची अत्याधुनिक सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन मिळाली आहे. ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ योजनेअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

पुणे ०३ जुलै २०२६ : बारामती शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य शासनाच्या ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत बारामती नगरपरिषदेला सुमारे 1 कोटी रुपयांची अत्याधुनिक कंबाइंड सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन उपलब्ध झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठपुराव्यामुळे ही सुविधा बारामतीला मिळाल्याची माहिती नगराध्यक्ष सचिन सातव आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी दिली.

अत्याधुनिक सीवर मशीन बारामती नगरपरिषदेच्या प्रांगणात दाखल झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आगामी बारामती दौऱ्यात तिचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही मशीन शहरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी कार्यरत होईल. या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे गटारे, सिव्हर लाईन आणि मलजल व्यवस्थापनाची कामे अधिक वेगाने, सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे पार पाडता येणार आहेत.

सुमारे 18 टन क्षमतेच्या चेसिसवर उभारण्यात आलेल्या या वाहनामध्ये एकूण 8,000 लिटर क्षमतेची टाकी आहे. त्यापैकी 4,000 लिटर गाळ साठवण्यासाठी आणि 4,000 लिटर पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या यंत्राद्वारे सिव्हर लाईनमधील गाळ काढणे, तुंबलेली गटारे मोकळी करणे, चेंबर्सची साफसफाई करणे तसेच पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा जलद निचरा करणे यांसारखी कामे अधिक कार्यक्षमतेने करता येणार आहेत.

या मशीनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांना आता जीव धोक्यात घालून मॅनहोलमध्ये उतरावे लागणार नाही. राज्य शासनाच्या ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ या उपक्रमाचा मुख्य उद्देशच स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. यामुळे भूमिगत गटारे, मलजल वाहिन्या, सेप्टिक टाक्या, सिव्हेज टाक्या आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई यांत्रिक पद्धतीने केली जाणार असून मानवी हस्तक्षेप लक्षणीयरीत्या कमी होईल.

बारामती शहरातील अनेक सिव्हर चेंबर्स 10 ते 15 फूट खोल असल्याने आतापर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत होते. शहराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक मशीनची आवश्यकता ओळखत नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर बारामतीला ही अत्याधुनिक सुविधा मंजूर करण्यात आली.

नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले की, बारामतीमध्ये आधुनिक आणि दर्जेदार स्वच्छता व्यवस्था उभारण्यावर नेहमीच भर देण्यात आला आहे. या मशीनमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल आणि शहराची स्वच्छता अधिक प्रभावी होईल. आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनीही ही मशीन बारामतीच्या आधुनिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.

अत्याधुनिक सीवर मशीनमुळे बारामतीच्या स्वच्छता व्यवस्थेत तांत्रिक परिवर्तन होणार असून, शहरातील नागरिकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Follow us on our social media handles:
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed