मुंबईत आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना लोक सहभागासाठी पालिकेची प्रशिक्षण शिबिरे

मुंबईत आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना लोक सहभागासाठी पालिकेची प्रशिक्षण शिबिरे
मुंबईतील वृक्षगणना मोहिमेत आधुनिक उपकरणे आणि मोबाईल ॲपचा वापर. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांवर भर.
पुणे ०५ मे २०२६ : मुंबई शहरातील पर्यावरणीय संतुलन जपण्यासाठी आणि हरित संपत्तीचा अचूक डेटा मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत यंदा वृक्षगणना मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ कागदोपत्री नोंदी न करता, आधुनिक तांत्रिक उपकरणे आणि विशेष मोबाईल ॲपच्या सहाय्याने प्रत्येक वृक्षाची शाखीय पद्धतीने नोंद केली जाणार आहे. यामुळे शहरातील वृक्षसंपदेचा अद्ययावत आणि शास्त्रीय तपशील उपलब्ध होणार असून, भविष्यातील पर्यावरणीय नियोजनासाठी हा डेटा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
ही संपूर्ण मोहीम ‘सार आयटी रिसोर्सेस’ या खाजगी कंपनीमार्फत राबवली जात आहे. प्रगणक केवळ सार्वजनिक रस्ते, उद्याने किंवा मोकळी मैदाने यापुरते मर्यादित न राहता, सोसायटी परिसर, शासकीय व खासगी संस्थांचे आवार, तसेच खाजगी मालमत्तेतील वृक्षांचीही नोंद घेणार आहेत. त्यामुळे जेव्हा प्रगणक आपल्या परिसरात येतील, तेव्हा त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही गणना अधिक अचूक आणि सर्वसमावेशक होऊ शकणार आहे.
मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी या मोहिमेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, वृक्षगणना हे शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या शास्त्रीय प्रक्रियेमुळे वृक्षांची प्रजाती, वय, आरोग्यस्थिती आणि भौगोलिक स्थान यांची अचूक नोंद होणार आहे. परिणामी, शहरातील हरित क्षेत्रांची वास्तविक स्थिती समजून घेता येईल आणि वृक्षतोड, वृक्षारोपण, तसेच हरित पट्ट्यांचे नियोजन अधिक परिणामकारक पद्धतीने करता येईल.
लोकसहभाग वाढवण्यासाठी पालिकेने विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणी बाग) येथे विशेष प्रशिक्षण सेमिनार पार पडला. या शिबिराला पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी आणि तज्ज्ञांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षांची ओळख कशी करावी, त्यांचे वय कसे निश्चित करावे, वृक्षांच्या आरोग्याचा अभ्यास कसा करावा आणि मोबाईल ॲप व आधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्येही शिबिरे आयोजित केली जात आहेत. घाटकोपर येथील राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज येथे झालेल्या शिबिरात वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरणे हाताळून वृक्षगणनेची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली, ज्यामुळे त्यांना शास्त्रीय पद्धतीने वृक्षसंपदेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
या मोहिमेमुळे शहरातील वृक्षसंपत्तीची डिजिटल आणि अचूक माहिती उपलब्ध होणार असून, भविष्यातील विकासकामांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या डेटाचा मोठा उपयोग होणार आहे. प्रशासन, विद्यार्थी, पर्यावरणतज्ज्ञ आणि नागरिक यांच्या एकत्रित सहभागातून हा उपक्रम अधिक प्रभावी बनत आहे. मुंबईकरांनी या मोहिमेत सहकार्य करून शहराच्या हरित भवितव्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare