हिंजवडीत अनधिकृत बांधकामांवर PMRDA ची कारवाई, आठ जणांवर गुन्हे दाखल

हिंजवडीत अनधिकृत बांधकामांवर PMRDA ची कारवाई,
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीनंतर PMRDA ने कारवाईचा बडगा उगारला असून आठ जणांविरोधात पर्यावरण व जलप्रदूषण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल.
सायली मेमाणे
पुणे ७ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचा साठा वाढल्यामुळे अक्षरशः पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमुळे अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) कारवाईचा बडगा उगारत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पीएमआरडीएच्या प्राथमिक पाहणी अहवालानुसार काही जागामालक आणि व्यावसायिकांनी नाले बुजवून किंवा नैसर्गिक प्रवाह अडवून अनधिकृत बांधकामे केली होती, ज्यामुळे परिसरात पाणी साचले. परिणामी हिंजवडी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या आरोपींमध्ये चार जागामालक आणि त्यांच्या जागांवर व्यवसाय करणारे चार व्यावसायिक यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि जल प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1974 अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत. यातील गुन्ह्यांची तीव्रता कमी असल्याने अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अटक झाली तरीही त्वरित जामिनावर सुटका होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या कारवाईपूर्वीच पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी 1 जुलै रोजी या भागाची पाहणी करून अतिक्रमण आणि प्रवाह अडवलेल्या ठिकाणांवर तातडीने कारवाईचा इशारा दिला होता. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर संबंधित व्यक्तींना नोटीस बजावण्यात आल्या आणि नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्देशांची अंमलबजावणी न केल्याने एफआयआर दाखल करण्यात आले. या प्रकरणात शशिकांत साखरे आणि गुरुकृपा बॅंगल स्टोअर्सचे विकसक विठ्ठल तडकेवार यांचाही समावेश आहे.
दरम्यान, हिंजवडी, माण, मारुंजी आणि इतर सात गावांतील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा यासाठी पुन्हा एकदा मोहीम उभारली आहे. यासाठी आयटी क्षेत्रातील नागरिकांकडून ऑनलाईन सह्यांची मोहिम राबवली जात असून आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांनी या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले असून त्यानंतरच प्रशासनाने कारवाईस वेग दिला आहे.
हिंजवडीत वाढत्या लोकवस्तीमुळे आणि आयटी कंपन्यांच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या वाढीमुळे नैसर्गिक प्रवाह आणि जलवाहिन्यांवर अतिक्रमण वाढले आहे. याचा थेट परिणाम दरवर्षी होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीवर होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या त्वरित आणि कठोर कारवाईची गरज होती. आता उर्वरित दोषींविरोधातही पुढील तपास व कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter