5 शहरांमध्ये काँग्रेसचा महापौर? महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकांमध्ये काँग्रेसचा दावा मजबूत

0
5 शहरांमध्ये काँग्रेसचा महापौर? महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकांमध्ये काँग्रेसचा दावा मजबूत

5 शहरांमध्ये काँग्रेसचा महापौर? महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकांमध्ये काँग्रेसचा दावा मजबूत

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस 5 शहरांमध्ये महापौर पदावर दावा करत आहे. लातूर, चंद्रपूर, भिवंडी, परभणी आणि कोल्हापूरमधील राजकीय समीकरणे जाणून घ्या सविस्तर.

पुणे १८ जानेवारी २०२५: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी समोर आल्या आहेत. भाजप सर्वाधिक जागा मिळवून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी या निकालांमध्ये काँग्रेसनेही आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे प्रचारात फारशी चर्चा नसलेल्या काँग्रेस पक्षाचे तब्बल 330 हून अधिक उमेदवार निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील पाच महानगरपालिकांमध्ये काँग्रेसचा महापौर बसणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

सपकाळ यांनी सांगितले की, या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सुमारे 350 नगरसेवक निवडून आणत राज्यभरात मजबूत उपस्थिती नोंदवली आहे. केवळ जागांची संख्या नव्हे, तर सत्तास्थापनेच्या दृष्टीनेही काँग्रेस किमान दहा महानगरपालिकांमध्ये निर्णायक भूमिकेत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार लातूर, चंद्रपूर, भिवंडी, परभणी आणि कोल्हापूर या पाच शहरांमध्ये काँग्रेस महापौर पदासाठी दावा मजबूत करत आहे.

लातूर महानगरपालिकेत काँग्रेसने थेट बहुमत मिळवत 70 पैकी 43 जागा जिंकल्या आहेत. भाजपला येथे 22 तर वंचित बहुजन आघाडीला 4 जागा मिळाल्या आहेत. स्पष्ट बहुमत असल्याने लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस 30 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला 23, ठाकरे गटाला 6, वंचितला 1 आणि इतरांना 4 जागा मिळाल्या आहेत. 66 जागांच्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक आकडा कोणाकडेही नसला, तरी काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे आघाडी किंवा पाठिंब्याच्या माध्यमातून येथे महापौर पद मिळवण्याची शक्यता काँग्रेसकडून व्यक्त केली जात आहे.

भिवंडी महानगरपालिकेतील समीकरण अधिक गुंतागुंतीचे आहे. येथे काँग्रेसला 30 जागा मिळाल्या असून भाजप 22 जागांवर आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 12 जागा, तर इतरांना 14 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला इतर पक्षांचा पाठिंबा आवश्यक असून, येत्या काही दिवसांत येथे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

परभणी महानगरपालिकेत ठाकरे गटाला 25, काँग्रेसला 12 आणि भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असून कोणताही पक्ष स्वतंत्रपणे तो आकडा गाठू शकलेला नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसने 34 जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ मिळवले आहे. भाजप 26, शिंदे गट 15 आणि अजित पवार गट 4 जागांवर आहे. बहुमतासाठी 41 जागांची गरज असल्याने काँग्रेसला इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आल्यास सत्ता समीकरण बदलू शकते. त्यामुळे कोल्हापूरमधील महापौर पदाची लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर, तसेच बोगस मतदानाचे गंभीर आरोप केले आहेत. मुंबईसह काही ठिकाणी निकाल ‘फिक्स’ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तरीही काँग्रेस आज राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आणि दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *