एनडीएमध्ये १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंगचा कुटुंबीयांचा आरोप
एनडीएमध्ये १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंगचा कुटुंबीयांचा आरोप
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये १८ वर्षीय कॅडेट अंत्रीक्ष कुमार सिंग मृतावस्थेत आढळला. कुटुंबीयांनी रॅगिंगचा आरोप करत तपासाची मागणी केली आहे. या घटनेने एनडीएमध्ये खळबळ उडाली आहे.
सायली मेमाणे
पुणे १३ ऑक्टोबर २०२५ : पुण्याजवळील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) या देशातील सर्वोच्च सैनिकी प्रशिक्षण संस्थेमध्ये १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव अंत्रीक्ष कुमार सिंग असे असून तो मूळचा लखनऊ, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. एनडीएमध्ये नुकतेच पहिल्या टर्मचे प्रशिक्षण सुरू झाले होते आणि तो या टर्ममध्ये नव्याने दाखल झाला होता. मात्र शुक्रवारी पहाटे त्याचा मृतदेह हॉस्टेलमधील खोलीत मृतावस्थेत आढळल्याने या घटनेने संपूर्ण अकादमीमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मृत कॅडेटच्या कुटुंबीयांनी थेट एनडीएमधील रॅगिंगला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अंत्रीक्षला सतत मानसिक त्रास दिला जात होता आणि प्रशिक्षणादरम्यान त्याच्यावर अनावश्यक दबाव टाकला जात होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा आरोप त्यांनी केला आहे. कुटुंबीयांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी ही देशातील तीनही सैन्यदलांसाठी अधिकारी तयार करणारी प्रतिष्ठित संस्था आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडल्याने राष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. एनडीएतील शिस्तबद्ध वातावरणात अशी घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, या प्रकरणाची चौकशी संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय पातळीवरून केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा प्राथमिक तपास सुरू केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत आत्महत्येचा संशय वर्तवण्यात येत असला तरी, रॅगिंगची शक्यता नाकारली गेलेली नाही. मृत कॅडेटच्या मोबाइल फोन आणि वैयक्तिक वस्तू तपासासाठी जप्त करण्यात आल्या आहेत.
या घटनेनंतर एनडीएमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक माजी एनडीए अधिकाऱ्यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, एनडीएमध्ये प्रशिक्षण कठोर असते, परंतु प्रत्येक कॅडेटची शारीरिक व मानसिक स्थिती लक्षात घेऊनच प्रशिक्षणाची प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे अशा प्रकारचा मृत्यू अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामागील खरा कारण शोधणे गरजेचे आहे.
अंत्रीक्ष कुमार सिंग हा लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होता. त्याने एनडीएमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अनेक वर्षे तयारी केली होती. मात्र, प्रशिक्षण सुरू होऊन अवघे काही आठवडे होताच त्याचा असा अंत झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लखनऊतील त्याच्या गावातही वातावरण हळहळ व्यक्त करणारे आहे.
सध्या एनडीए प्रशासन, संरक्षण मंत्रालय आणि पोलिस या घटनेच्या चौकशीत गुंतले आहेत. रॅगिंगचा आरोप खरा ठरल्यास हे प्रकरण अत्यंत गंभीर ठरू शकते. एनडीए ही देशाच्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी घडवणारी संस्था असल्याने अशा घटनांनी तिची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे.