पुण्यात दोन धक्कादायक घटना! नांदेड सिटीत तरुणीचा पाठलाग, विश्रांतवाडीत शाळकरी मुलीसोबत गैरवर्तन; आरोपी अटकेत
पुण्यात दोन धक्कादायक घटना! नांदेड सिटीत तरुणीचा पाठलाग, विश्रांतवाडीत शाळकरी मुलीसोबत गैरवर्तन; आरोपी अटकेत
पुण्यात नांदेड सिटी आणि विश्रांतवाडी परिसरात दोन महिला आणि मुलींसोबत गैरवर्तनाच्या घटना उघड झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
सायली मेमाणे
४ ऑक्टोबर २०२५ : पुणे शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. नांदेड सिटी आणि विश्रांतवाडी या दोन वेगवेगळ्या परिसरांमध्ये तरुणी आणि अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तनाच्या घटना घडल्या असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनांनी पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नांदेड सिटी परिसरातील ही घटना शनिवारी रात्री घडली. एका तरुणीने जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली असताना, एका संशयित व्यक्तीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. सिंहगड रोडवरील नांदेड सिटी भागात चालत असताना, आरोपी काही अंतरावरून तिच्या मागे आला आणि अचानक तिचा हात पकडून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तत्काळ आरडाओरडा करताच आरोपी तिथून पळून गेला. ही घटना जवळील झेरॉक्स दुकानातील सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळी महिलांनी एकट्याने फिरताना सावधगिरी बाळगावी, अशी मागणी केली आहे. नांदेड सिटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून आरोपीचा मागोवा घेत आहे.
दरम्यान, विश्रांतवाडी परिसरातही एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका 50 वर्षीय व्यक्तीने शाळकरी मुलीला दुचाकीवर फिरवण्याचा बहाणा करत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आरोपीचे नाव श्रीराम आल्हाट असे असून, तो कळस परिसरातील रहिवासी आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.
या दोन्ही घटनांमुळे पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पोलिसांकडून अधिक सतर्कता आणि गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा प्रकार दिसल्यास तात्काळ 112 हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे. पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणांमध्ये पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
महिलांवरील अशा घटनांमुळे सामाजिक सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान वाढले आहे. शहरात वाढत्या सीसीटीव्ही नेटवर्क, महिला बीट पथक आणि ‘सुरक्षित पुणे’ योजनेअंतर्गत होणाऱ्या उपाययोजनांवर नागरिकांची नजर आहे.