कल्याणमध्ये धक्कादायक घटना! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू? रुक्मिणीबाई हॉस्पिटलवर गंभीर आरोप
कल्याणमध्ये धक्कादायक घटना! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू? रुक्मिणीबाई हॉस्पिटलवर गंभीर आरोप
कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारानंतर घरी पाठवलेल्या डेव्हिड घाडगे यांचा मृत्यू. डॉक्टर गप्पा मारत बसल्याचा आरोप; कुटुंबीयांचा संताप आणि कारवाईची मागणी.
सायली मेमाणे
१६ नोव्हेंबर २०२५ : कल्याण शहरातील रुक्मिणीबाई रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केल्याने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. डेव्हिड घाडगे (David Ghadge) या 55 वर्षीय पुरुषाचा उपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, असा दावा त्यांच्या मुलाने आणि नातेवाईकांनी केला आहे.
डेव्हिड घाडगे हे आंबिवली परिसरातील रहिवासी असून मुंबईतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ते मुंबईहून कल्याणला परत येत होते. कल्याण रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून उतरताना पाय घसरल्याने ते जोरात पडले आणि गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांचा मुलगा तुषार घाडगे यांनी तातडीने त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालयात डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले, मात्र त्यांना ऍडमिट न करता फक्त दुसऱ्या दिवशी एक्स-रे काढण्याचा सल्ला देत घरी पाठवले. तुषारच्या म्हणण्यानुसार, वडिलांचा त्रास वाढत असतानाही डॉक्टरने पुनःपुन्हा विनंती ऐकली नाही. “डॉक्टर माझ्या वडिलांचे म्हणणे ऐकण्याऐवजी गप्पा मारत बसला होता. मी अनेकदा विनंती केली की त्यांना ऍडमिट करा पण त्याने मला दुर्लक्ष केले,” असा गंभीर आरोप तुषारने केला आहे.
घरी गेल्यानंतर डेव्हिड यांची प्रकृती आणखी खालावली. शनिवारी सकाळी एक्स-रे साठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी सुरू होती. मात्र घरातच, लघवी करत असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांनी दुर्दैवी मृत्यू पावला. हा धक्कादायक मृत्यू समजताच कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत मृतदेह पुन्हा रुक्मिणीबाई हॉस्पिटलसमोर आणला.
डेव्हिड यांचा मुलगा तुषार घाडगे आणि नातेवाईक गौतम मोरे यांनी डॉक्टरांवर थेट निष्काळजीपणाचा आरोप करत आंदोलन सुरू केले आहे. “जर डॉक्टरांनी उपचार योग्य प्रकारे केले असते, तर आज माझे वडील जिवंत असते. त्यांनी हलगर्जीपणा केला आणि त्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, संबंधित डॉक्टरवर कारवाई होईपर्यंत पोस्टमॉर्टमसुद्धा होऊ देणार नाहीत आणि मृतदेह ताब्यातही घेणार नाहीत.
या प्रकरणामुळे रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर आणि डॉक्टरांच्या जबाबदारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप गंभीर मानले जात असल्याने पोलीस आणि महानगरपालिका अधिकारी तपासात पुढे येण्याची शक्यता आहे.
घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण केली आहे. काही वर्षांपासून रुक्मिणीबाई रुग्णालयावर उपचारांच्या गुणवत्तेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या नव्या प्रकरणामुळे या रुग्णालयाची प्रतिमा पुन्हा एकदा धुळीस मिळण्याची धोका निर्माण झाला आहे.
कुटुंबीयांचा आरोप योग्य आहे की नाही, याची चौकशी पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र एका जखमी व्यक्तीला ऍडमिट न करता घरी पाठवल्याने त्याचा मृत्यू झाला, असा दावा समोर येत असल्याने हे प्रकरण आणखी गंभीर होत आहे. नागरिकांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.