पुणे : यकृत प्रत्यारोपण प्रकरणात सह्याद्री रुग्णालयाला क्लीन चीट; चौकशी समितीचा अहवाल जाहीर

0
पुणे : यकृत प्रत्यारोपण प्रकरणात सह्याद्री रुग्णालयाला क्लीन चीट; चौकशी समितीचा अहवाल जाहीर

पुणे : यकृत प्रत्यारोपण प्रकरणात सह्याद्री रुग्णालयाला क्लीन चीट; चौकशी समितीचा अहवाल जाहीर

पुण्यातील यकृत प्रत्यारोपणानंतर दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणात सह्याद्री रुग्णालयाला चौकशी समितीकडून क्लीन चीट मिळाली असून, लिव्हर ट्रान्सप्लांटवरील स्थगिती हटवण्यात आली आहे.

सायली मेमाणे

पुणे २९ नोव्हेंबर २०२५ : पुण्यातील यकृत प्रत्यारोपणानंतर एकाच दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. सह्याद्री रुग्णालयावर कुटुंबीयांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप झाले होते आणि त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. समितीने आपल्या तपशीलवार अहवालात रुग्णालयाची कोणतीही वैद्यकीय चूक किंवा दुर्लक्ष आढळून न आल्याचे स्पष्ट केले असून, सह्याद्री रुग्णालयाला क्लीन चीट देण्यात आली आहे. परिणामी, रुग्णालयातील लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवरील स्थगिती 27 नोव्हेंबरपासून हटवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केले आहेत.

हे संपूर्ण प्रकरण 15 ऑगस्ट रोजी झालेल्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर सुरू झाले. बापू कोमकर आणि त्यांची पत्नी कामिनी कोमकर या दोघांवर एकाच दिवशी प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडली. मात्र शस्त्रक्रियेच्या दोन दिवसांनी, म्हणजेच 17 ऑगस्टला बापू कोमकर यांचा मृत्यु झाला. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी कामिनी कोमकर यांचाही संसर्गाच्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत न्यायाची मागणी केली. सार्वजनिक आरोग्य विभागाने या प्रकरणाची सखोल समीक्षा करण्यासाठी यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यीय समिती गठित केली.

समितीने गेल्या महिन्यात अहवाल सादर केला होता. यानंतर 6 नोव्हेंबर रोजी आरोग्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यीय राज्य सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तज्ज्ञांनी पूर्वीच्या अहवालातील निष्कर्षांचा बारकाईने आढावा घेऊन यकृत दाता आणि प्रत्यारोपित रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत कोणतीही वैद्यकीय त्रुटी, पद्धतशीर चूक किंवा निष्काळजीपणाचे लक्षण आढळत नसल्याचे मत नोंदवले. तपासात प्रत्यारोपणाची प्रक्रिया, रुग्णांची शस्त्रक्रियेनंतरची स्थिती, उपचार प्रोटोकॉल आणि औषधोपचार यांचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले.

आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, समितीच्या अंतिम अहवालात रुग्णालयाकडून कोणतेही चुकीचे वैद्यकीय निर्णय किंवा प्रक्रियात्मक चूक झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे सह्याद्री रुग्णालयातील लिव्हर ट्रान्सप्लांट प्रक्रियेवरील स्थगिती हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदेशांमुळे रुग्णालयातील प्रत्यारोपण विभागाची अनिश्चितता दूर झाली असून, या प्रकरणात रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ही घटना राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली होती. त्यामुळेच उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल तपासाची मागणी करण्यात आली होती. आता समितीच्या निष्कर्षांनंतर सह्याद्री रुग्णालयावरील गंभीर आरोप दूर झाल्याचे स्पष्ट झाले असून, प्रत्यारोपण प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन याबाबत रुग्णालयाने योग्य पद्धतीने काम केल्याचे अधोरेखित झाले आहे. या निर्णयामुळे रुग्णालयातील उपचार सेवा पुन्हा सुरळीत होतील, असे आरोग्य विभागाचे मत आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *