कराडमधील राष्ट्रीय महामार्ग अपघातांचा सापळा; 100 हून अधिक अपघात, 54 जणांचा मृत्यू – विधानसभेत गंभीर मुद्दा उपस्थित
कराडमधील राष्ट्रीय महामार्ग अपघातांचा सापळा; 100 हून अधिक अपघात, 54 जणांचा मृत्यू – विधानसभेत गंभीर मुद्दा उपस्थित
कराड परिसरातील पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट सहापदरीकरणामुळे 100 पेक्षा जास्त अपघात झाले असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे. रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामावर विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.
पुणे १५ डिसेंबर २०२५ : कराड परिसरातील पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ सध्या अपघातांचा सापळा ठरत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या महामार्गावरील रखडलेल्या सहापदरीकरणाच्या कामाचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. कराड येथील अर्धवट उड्डाणपुलामुळे गेल्या काही वर्षांत 100 पेक्षा अधिक अपघात झाले असून त्यामध्ये तब्बल 54 नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सभागृहात मांडली.
डॉ. भोसले यांनी सांगितले की, पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र कराड शहरातील पंकज हॉटेलपासून नांदलापूरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, अचानक वळणे, अपूर्ण सर्व्हिस रोड, अपुरे संकेत फलक आणि अंधुक प्रकाशयोजना यामुळे वाहनचालकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.
महामार्गावरील असुरक्षिततेचे गांभीर्य अधोरेखित करताना त्यांनी नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघाताचा उल्लेख केला. पिंपळगाव येथील एका महाविद्यालयाची बस सहलीसाठी कणकवलीला गेली होती. परतीच्या प्रवासादरम्यान कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ या बसचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कृष्णा हॉस्पिटलची वैद्यकीय टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. बसमधील 40 विद्यार्थ्यांपैकी 6 जणांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले, तर 2 विद्यार्थ्यांची प्रकृती अतिगंभीर होती. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली, मात्र महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना थेट प्रश्न विचारत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची नेमकी अंतिम मुदत काय आहे, असा सवाल उपस्थित केला. यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र आजही प्रत्यक्षात पुलाचे काम अपूर्ण असून जरी 83 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी, साईटवर कामगार आणि प्रोजेक्ट इन्चार्ज दिसून येत नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
यासोबतच, महामार्गावरील सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था, अपूर्ण ड्रेनेज व्यवस्था आणि पावसाळ्यात होणारी चिखलयुक्त परिस्थिती यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारंवार सूचना देऊनही कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) मार्फत कठोर कारवाई केली जाणार का, तसेच याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस होणार का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा–कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुरू असून ते सध्या प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. काही ठेकेदारांकडून दिरंगाई झाल्याचे मान्य करत, संबंधित प्रकरणी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, तोपर्यंत कराड परिसरातील महामार्गावरील वाढते अपघात आणि जीवितहानीचा प्रश्न कायम असून, स्थानिक नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information