Raigad News: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यविभागाची धडक कारवाई; रायगडमधील तीन नौका व साहित्य जप्त
Raigad News: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यविभागाची धडक कारवाई; रायगडमधील तीन नौका व साहित्य जप्त
रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत LED मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. तीन मासेमारी नौका आणि मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.
पुणे २० डिसेंबर २०२५ : महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून रायगड जिल्ह्यात याची झलक पाहायला मिळाली आहे. LED आणि उच्च क्षमतेच्या लाईट्सचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकांवर विभागाच्या गस्ती नौकांमार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत रायगड जिल्ह्यातील एकूण तीन मासेमारी नौका आणि मोठ्या प्रमाणात अनधिकृत मासेमारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अलिबाग किनारपट्टी परिसरात ही कारवाई करण्यात आली. 17 तारखेला रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास साई गणेश (IND-MH-7-MM-1318) ही मासेमारी नौका अनधिकृतपणे LED पद्धतीने मासेमारी करत असल्याचे आढळून आले. ही नौका राममंदिर, केळवणे (ता. पनवेल) येथील जगन्नाथ माया कोळी यांच्या मालकीची असून मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने तिला ताब्यात घेतले. याच रात्री 11 वाजता अलिबाग समोरील समुद्रात हेरंब कृपा (IND-MH-3-MM-4194) ही मासेमारी नौका देखील LED मासेमारी करताना आढळली. ही नौका साखरकोळीवाडा, आक्षी (ता. अलिबाग) येथील यशवंत गणपत नाखवा यांच्या मालकीची आहे.
तसेच 18 तारखेला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील करंजा येथील प्रकाश तुकाराम पाटील यांच्या श्रीसमर्थ कृपा (IND-MH-7-MM-3627) या मासेमारी नौकेची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान या नौकेतून मोठ्या क्षमतेचे अंडरवॉटर LED लाईट्स, सीया लाईट्स, हॅलोजन बल्ब आणि जनरेटर असा मोठ्या प्रमाणात अनधिकृत मासेमारीसाठी वापरला जाणारा साहित्यसाठा आढळून आला. 4000 वॅट, 3000 वॅट आणि 2500 वॅट क्षमतेचे अंडरवॉटर LED लाईट्स, 1000 वॅटचे सीया लाईट्स आणि इतर विद्युत उपकरणे जप्त करण्यात आली.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तिन्ही मासेमारी नौका आणि त्यावरील साहित्य जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. LED मासेमारीमुळे समुद्री परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होतो. अशा पद्धतीने मासेमारी केल्याने लहान मासे, अंडी आणि समुद्री जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शासनाने या पद्धतीवर बंदी घातली असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सागरी सुरक्षा आणि पारंपरिक मच्छिमारांचे हित जपण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग सातत्याने गस्त वाढवत आहे. अनधिकृत मासेमारीवर अशा कारवायांमुळे आळा बसेल, तसेच समुद्री पर्यावरणाचे संरक्षण आणि सागरी सुरक्षेत वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील काळातही अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information