पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस, राष्ट्रवादीत चांदेरे की निकम यांची लागणार वर्णी?
पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस, राष्ट्रवादीत चांदेरे की निकम यांची लागणार वर्णी?
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता निश्चित, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली. बाबुराव चांदेरे आणि निलेश निकम यांची नावे चर्चेत.
पुणे 2५ जानेवारी २०२६ : पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, आता सर्वांचे लक्ष महत्त्वाच्या पदांच्या वाटपाकडे लागले आहे. भाजपने तब्बल ११९ जागांवर निर्विवाद विजय मिळवत महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणे निश्चित मानले जात असले, तरी विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवडणूक होणार असून, त्याचवेळी सभागृहातील इतर महत्त्वाच्या पदांवरही शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिकेतील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट २७ नगरसेवकांसह सर्वांत मोठा विरोधी पक्ष ठरतो. काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट केवळ ३ जागांवर मर्यादित राहिला आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी हे दोन्ही गट युतीत होते, त्यामुळे सभागृहात ते एकत्र राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एकमेव नगरसेवक देखील सभागृहात असणार आहे. या राजकीय गणितांचा विचार करता विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, या पदाबाबत एक वेगळे राजकीय वास्तवही समोर येत आहे. राज्याच्या सत्तेत भाजप आणि अजित पवार गट एकत्र असल्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादीकडून कितपत आक्रमक विरोध केला जाईल, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात भाजपविरोधातील तीव्र भूमिका काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षनेतेपद जरी राष्ट्रवादीकडे गेले, तरी सभागृहातील विरोधाचा सूर किती धारदार राहील, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, अजित पवार गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दोन प्रमुख नावे सध्या चर्चेत आहेत. यामध्ये अनुभवी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. सभागृहाच्या कामकाजाची सखोल माहिती, प्रशासनावर असलेली पकड आणि आक्रमक शैली ही त्यांची प्रमुख बलस्थाने आहेत. भाजपकडे प्रचंड संख्याबळ असल्याने विरोधी पक्षाने ठाम आणि स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चांदेरे यांचा अनुभव पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे, नगरसेवक निलेश निकम यांचे नावही तितकेच चर्चेत आहे. सलग पाचव्यांदा महापालिकेवर निवडून आलेले निकम हे अनुभवी आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांची शैली तुलनेने शांत आणि संयमी असली, तरी मुद्देसूद मांडणी आणि दीर्घ अनुभवामुळे तेही पक्षासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानले जात आहेत. आक्रमक विरोधासोबतच सभागृहातील सुसंवाद आणि संतुलन राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने, पक्ष नेतृत्व कोणत्या निकषांवर निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपच्या स्पष्ट बहुमताच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची भूमिका केवळ संख्येवर नव्हे, तर मुद्द्यांवर आधारित आणि प्रभावी असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व चांदेरे आणि निकम यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते, याकडे पुण्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information