ताथवडे येथे ‘यशदा’च्या नवीन प्रशिक्षण केंद्रासाठी 120 एकर जागा; महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर
‘यशदा’च्या नवीन प्रशिक्षण केंद्रासाठी 120 एकर जागा
ताथवडे येथे यशदाला 120 एकर जागा; सर्व विभागांतील वर्ग एक अधिकाऱ्यांसाठी ‘एलबीएसएनए’च्या धर्तीवर राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभारणार.
सायली मेमाणे
२५ जून २०२५ : राज्य सरकारने ताथवडे येथील १२० एकर जमीन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या संस्थेला दिली असून, येथे राष्ट्रीय स्तरावरचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या (LBSNAA) धर्तीवर हे केंद्र उभारले जाणार असून, महाराष्ट्र असे केंद्र उभारणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
या केंद्रात राज्यातील सर्व विभागांमधील नव्याने भरती झालेल्या तसेच कार्यरत असलेल्या वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना केंद्रीकृत आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे प्रशासनिक दर्जा अधिक सक्षम आणि समन्वयात्मक होण्यास मदत होणार आहे. सध्या विभागीय पातळीवर विविध प्रशिक्षण आयोजित केले जातात, मात्र ‘यशदा’चा विस्तार झाल्यानंतर ही प्रक्रिया केंद्रीत होणार आहे.
या संदर्भात माहिती देताना यशदा चे महासंचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितले की, राज्य सरकारने हा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनुसार घेतला असून, भविष्यातील प्रशासकीय गरजांनुसार यशदाचा विकास ही वेळेची गरज आहे. सध्या पुणे येथील यशदाची जागा अपुरी पडत आहे आणि अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र आणि विशाल सुविधा आवश्यक आहेत.
हे प्रशिक्षण केंद्र केवळ प्रशिक्षण वर्गांपुरते मर्यादित नसून, तेथे अधिवासासाठी निवासस्थाने, सुसज्ज ग्रंथालये, सभागृह, पर्यावरणपूरक वास्तुकला आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रशिक्षण सुविधा देखील असणार आहेत. केंद्रात विविध विषयांवरील अभ्यासक्रम तयार करणे, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेणे, इतर प्रशिक्षण संस्थांना गुणवत्ता मानके पुरवणे आणि प्रशिक्षणाचे मूल्यांकन करणे अशी सर्वसमावेशक जबाबदारी यशदामार्फत पार पाडली जाणार आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या प्रशासकीय कार्यपद्धतीला एक नवीन दिशा मिळणार असून, कार्यक्षम, प्रशिक्षणप्राप्त अधिकाऱ्यांची फळी तयार होईल. प्रशासनातील पारदर्शकता, गतिशीलता आणि कार्यक्षमतेसाठी यशदाचा विस्तार हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
अशी आशा व्यक्त होत आहे की नवीन यशदा संकुल हे केवळ राज्यातील नाही तर देशातील इतर राज्यांसाठीही एक आदर्श ठरेल.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz