पांढऱ्या वेशातील सख्ख्या बहिणींचा भ्रूणहत्येचा अड्डा उध्वस्त; छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक कारवाई
पांढऱ्या वेशातील सख्ख्या बहिणींचा भ्रूणहत्येचा अड्डा उध्वस्त; छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक कारवाई
छत्रपती संभाजीनगरात अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटवर पोलिस व महापालिकेची संयुक्त कारवाई. परिचारिका असलेल्या सख्ख्या बहिणींसह टोळीचा पर्दाफाश.
पुणे ०७ एप्रिल २०२६ : मराठवाड्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणे उघडकीस येत असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात धक्कादायक कारवाई झाली आहे. जीव वाचवण्याची शपथ घेतलेल्या वैद्यकीय क्षेत्रातीलच दोन सख्ख्या परिचारिका बहिणींनी पैशाच्या हव्यासापोटी भ्रूणहत्येचा अघोरी व्यवसाय उभारल्याचे समोर आले. महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला.
वर्षा जाधव आणि उर्मिला गायकवाड या दोघी सख्ख्या बहिणी पेशाने परिचारिका आहेत. मात्र, त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर उपचारांसाठी नव्हे तर गर्भातील जीव संपवण्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने १५ हजार रुपयांत गर्भलिंग तपासणी केली जात होती. स्त्रीभ्रूण असल्याचे आढळल्यास गर्भपातासाठी मोठी रक्कम उकळली जात होती. या रॅकेटमध्ये एजंटमार्फत ग्राहक शोधले जात आणि ग्रामीण भागातील महिलांना शहरात बोलावून वेगवेगळ्या ठिकाणी गर्भपात केला जात होता.
या प्रकरणाची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले यांनी पुरावे गोळा केले. ही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. पारस मंडालेचा यांना देण्यात आली. त्यानंतर संयुक्त छापा टाकण्यात आला. छाप्यात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या ११ पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला, त्यापैकी काहींचा वापर झाल्याचे दिसून आले.
तपासात ज्योती पवार नावाची महिला रुग्णांना आणण्याचे काम करत असल्याचे समोर आले. सिल्लोड तालुक्यात लिंग तपासणी केल्यानंतर स्त्रीभ्रूण असल्याचे कळल्यावर संबंधित महिलेला छत्रपती संभाजीनगरात आणून गर्भपात केला जात होता. पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने घरगुती पातळीवरच तपासणी केली जात असल्याचेही उघड झाले.
या संपूर्ण रॅकेटमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका होती. एजंट ग्राहक शोधत, विश्वास संपादन करत खर्च सांगत. दुसरा जण सोनोग्राफी करून लिंग सांगत असे. त्यानंतर गर्भपातासाठी मोठी रक्कम आकारली जात असे. गर्भपातासाठी सतत वेगवेगळ्या जागा बदलल्या जात असल्याने पोलिसांना माग काढणे कठीण जात होते. मात्र, गुप्त माहिती आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात यश आले.
या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रातील काही घटकांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ डॉक्टर किंवा परिचारिका नव्हे, तर गर्भातील निष्पाप जीव संपवण्याचा निर्णय घेणारे पालकही तितकेच जबाबदार असल्याचे वास्तव या कारवाईतून समोर आले. कायद्याने कडक बंदी असतानाही गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची अवैध साखळी काही भागांत अजूनही सक्रिय असल्याचे दिसते.
एक रॅकेट उद्ध्वस्त झाले असले तरी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाई, जनजागृती आणि कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे, अन्यथा पैशासाठी माणुसकी हरवलेल्या अशा टोळ्या पुन्हा डोके वर काढण्याची भीती कायम राहणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information