मुंबईत ‘वनरंग 2026’चा जल्लोष सुनेत्रा पवारांच्या हस्ते आदिवासी संस्कृतीचा भव्य उत्सव सुरू

0
मुंबईत ‘वनरंग 2026’चा जल्लोष सुनेत्रा पवारांच्या हस्ते आदिवासी संस्कृतीचा भव्य उत्सव सुरू

मुंबईत ‘वनरंग 2026’चा जल्लोष सुनेत्रा पवारांच्या हस्ते आदिवासी संस्कृतीचा भव्य उत्सव सुरू

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ‘वनरंग 2026’ महोत्सवाला सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुरुवात. आदिवासी कला, संस्कृती आणि उत्पादनांचे प्रदर्शन.

पुणे ०८ ऑगस्ट २०२६ : मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ‘वनरंग 2026’ या तीन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक आणि पारंपरिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या विविध आदिवासी समाजांची समृद्ध परंपरा, कला, हस्तकला, जीवनशैली आणि नैसर्गिक उत्पादनांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांचीही उपस्थिती होती.

दुर्गम जंगल, डोंगर-दऱ्या आणि ग्रामीण भागात पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली आदिवासी संस्कृती मुंबईसारख्या महानगरातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे, हा ‘वनरंग’ महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. भिल्ल, कोकणा, ठाकर आणि गोंड या चार प्रमुख आदिवासी जमातींच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती, हस्तकला, शेती उत्पादने, औषधी वनस्पती आणि स्थानिक जीवनपद्धती यांची माहिती नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

या महोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी कारागीर, महिला बचत गट, शेतकरी आणि पारंपरिक वैद्य यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचा प्रयत्न. मध्यस्थांची साखळी कमी करून उत्पादनांची विक्री थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे या विक्रीतून मिळणारा आर्थिक लाभ थेट संबंधित कारागीर आणि उत्पादकांना मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वारली आणि गोंड चित्रकला, सेंद्रिय शेतीमाल तसेच नैसर्गिक औषधी वनस्पती यांसारख्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत.

आदिवासी कला आणि हस्तकलेला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरही यावेळी भर देण्यात आला. महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी भागांमध्ये रोजगार, प्रशिक्षण आणि उद्योगाच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगण्यात आले. आदिवासी युवकांना शिक्षण, क्रीडा आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या प्रयत्नांनाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे.

‘वनरंग 2026’ महोत्सव 7 ते 9 ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील चार प्रमुख आदिवासी जमातींच्या जीवनशैलीचे प्रदर्शन यामध्ये करण्यात येत असून, देशातील अन्य 12 राज्यांमधून आलेल्या हस्तकला आणि पारंपरिक वस्तूंचे विशेष स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना देशातील विविध आदिवासी संस्कृती आणि कलांचा परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने एनसीपीएसमोरील मरीन ड्राईव्ह परिसरात कलाकार चेतन राऊत यांच्या संकल्पनेतून ‘जनजातीय मोझॅक आर्ट इन्स्टॉलेशन’ साकारण्यात आले आहे. तसेच छायाचित्रकार कोलस्टन ज्युलियन यांनी टिपलेल्या आदिवासी जीवनशैलीवरील छायाचित्रांचा समावेश असलेल्या ‘वनरंग फोटो बुक’चेही प्रकाशन करण्यात आले. आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि आर्थिक क्षमता मुंबईसारख्या महानगरासमोर मांडण्याबरोबरच स्थानिक उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे.

Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed