पुण्यात DJ-साऊंड नियमांचा भंग खडक पोलिसांच्या कारवाईनंतर मंडळ अध्यक्षांसह तिघांना न्यायालयाची शिक्षा

पुण्यात DJ-साऊंड नियमांचा भंग खडक पोलिसांच्या कारवाईनंतर मंडळ अध्यक्षांसह तिघांना न्यायालयाची शिक्षा
पुण्यात पोलीस आयुक्तांच्या DJ, लेजर लाईट व फटाक्यांवरील आदेशाचा भंग केल्याप्रकरणी खडक पोलिसांची कारवाई; मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष व साऊंड मालकाला न्यायालयाने दोषी ठरवले.
पुणे, ४ सप्टेंबर २०२६ : पुणे शहरात सार्वजनिक मिरवणुका आणि जुलूसांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि साऊंड सिस्टीम मालकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने तिघांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई ३ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित जुलूस आणि मिरवणुकांमध्ये डीजे साऊंड सिस्टीम, लेजर लाईट तसेच फटाक्यांचा वापर न करण्याबाबत आदेश जारी केले होते. या आदेशांचे उल्लंघन करून नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने गोंगाट किंवा उपद्रव करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी तसेच साऊंड सिस्टीम चालक आणि मालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट रोजी खडक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील लोहियानगर परिसरात अल मदिना यंग बॉईज मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. लोहियानगर कमानीजवळ सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यावेळी साऊंड सिस्टीमचा आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेपेक्षा अधिक असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष वाहिद कासम मणियार, उपाध्यक्ष जायेद मजीद शेख तसेच डीजे साऊंड सिस्टीमचे मालक प्रकाश कृष्णात अस्वले यांना नियमांची माहिती देत आवाज मर्यादेत ठेवण्याच्या सूचना केल्या. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये नोटीसही देण्यात आली. मात्र, वारंवार सूचना करूनही साऊंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेवून परिसरात गोंगाट केल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
यानंतर खडक पोलिसांनी सरकारतर्फे फिर्यादी होत संबंधित तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि २९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने कारवाई करत २४ तासांच्या आत दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रमांक ६, शिवाजीनगर, पुणे यांच्या न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने मंडळाचे अध्यक्ष वाहिद कासम मणियार, उपाध्यक्ष जायेद मजीद शेख आणि डीजे साऊंड सिस्टीम मालक प्रकाश कृष्णात अस्वले यांना भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि २९२ अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सार्वजनिक उत्सव आणि मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण तसेच पोलीस प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक समाधान पवार यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare