पुण्यात भवानी पेठ आणि आंबेगाव पठार भागात घडलेल्या दोन गुन्ह्यांत पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपींना अटक केली. वाहन तोडफोड प्रकरणात दोघे अटकेत, खून प्रकरणात आरोपी काही तासांत गजाआड.
सायली मेमाणे
पुणे २३ जुलै २०२५ : पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वाहनांची तोडफोड आणि एका तरुणाचा खून झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. भवानी पेठ भागातील मंजुळाबाई चाळीत टोळक्याने वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली, तर आंबेगाव पठार भागात १९ वर्षीय तरुणाचा लोखंडी धारदार शस्त्राने खून करण्यात आला. दोन्ही घटनांमध्ये पुणे पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली आहे.
भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत १८ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास टोळक्याने घातलेल्या धिंगाण्यात वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. आरोपी जयेश आणि रितेश सोनवणे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासोबत असलेल्या अन्य आरोपींचाही शोध सुरू आहे. टोळक्याने दुचाकी आणि रिक्षांची तोडफोड करत नागरिकांना शिवीगाळ केली, महिलांना धमकावले, आणि परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं. पोलिसांनी या प्रकरणात ५ आरोपींसह एका अल्पवयीनावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कुल्लाळ करत आहेत.
दुसरी धक्कादायक घटना आंबेगाव पठार भागात घडली. १९ वर्षीय आर्यन उर्फ निखील सावळे याचा खून करण्यात आला असून, आरोपी धैर्यशील मोरे याला पोलिसांनी काही तासांत अटक केली. पूर्वी झालेल्या किरकोळ वादातून आणि ‘कानशिलात मारल्याचा राग’ मनात धरून धैर्यशीलने लोखंडी धारदार शस्त्राने वार करत आर्यनचा खून केला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलेल्या आर्यनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करत चिंतामणी शाळेसमोरून त्याला ताब्यात घेतलं आणि गुन्ह्याची कबुली मिळवली.
या दोन्ही घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पुणे पोलिसांनी अशा घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळवून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter