• Wed. Jul 23rd, 2025

NewsDotz

मराठी

Loan Guarantor म्हणजेच जामीनदार होण्याचे फायदे व तोटे – एक सही आयुष्य उद्ध्वस्त करू शकते

Jul 23, 2025
जामीनदार होण्यापूर्वी 'या' धोक्यांची नोंद घ्या, अन्यथा लागेल मोठा आर्थिक चुना!जामीनदार होण्यापूर्वी 'या' धोक्यांची नोंद घ्या, अन्यथा लागेल मोठा आर्थिक चुना!

Bank Loan Guarantor बनताना सावध राहा! जामीनदार झाल्यानंतर कर्ज न फेडल्यास तुमच्यावर खटला, मालमत्ता जप्ती व क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.

सायली मेमाणे

पुणे २३ जुलै २०२५ : बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था कर्ज देताना काही वेळा कर्जदाराकडून हमीदाराची मागणी करते. आपल्याच ओळखीतील कोणी कर्ज घेणार असेल आणि मदतीच्या हेतूने आपण जामीनदार होण्याचा निर्णय घेतो, पण ही एक सही आपलं आर्थिक आयुष्य संकटात टाकू शकते. जर कर्जदाराने हफ्ते भरले नाहीत तर कर्ज फेडण्याची जबाबदारी थेट तुमच्यावर येते. बँक तुमच्याकडून थेट पैसे वसूल करू शकते, तुमच्यावर खटला दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला डिफॉल्टर ठरवले जाऊ शकते. त्यामुळे तुमचा पगार, बँक खातं किंवा मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. इतकंच नाही तर कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यास तुमच्याही क्रेडिट स्कोअरवर त्याचा वाईट परिणाम होतो. याचा परिणाम म्हणजे पुढे स्वतःसाठी कर्ज घेण्यात अडचण निर्माण होते. बँक किंवा वित्तसंस्था तुम्हाला कर्ज नाकारू शकते किंवा जास्त व्याजदराने मंजूर करू शकते.

जर कर्जदाराने कर्ज न फेडल्यास तुम्हाला केवळ मूळ रक्कमच नाही, तर त्यासोबत येणारं व्याज, विलंब शुल्क आणि दंडही भरावा लागू शकतो. अशा वेळेस, ही रक्कम अधिकच वाढते आणि ती परतफेड करणं कठीण होऊन बसतं. बँक यासाठी तुम्हाला कोर्टात खेचू शकते. अशा कायदेशीर कारवाईमुळे तुमच्यावर वकिलांचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि मानसिक ताण येतो. एकदा जर तुम्ही जामीनदार म्हणून सही केली, तर त्या करारातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य आहे. दुसरा हमीदार मिळेपर्यंत किंवा कर्जदार मालमत्ता गहाण टाकेपर्यंत तुम्ही कर्जाच्या ओझ्याखालीच असता. बँका सहसा हमीदार बदलण्याची परवानगी देत नाहीत.

या सगळ्या प्रक्रियेमुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतं. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे केला असता, तोच तुमच्या आयुष्यातील मोठा तणाव ठरतो. नात्यात कटुता, नैराश्य आणि मानसिक त्रास निर्माण होतो. याशिवाय, जर कोर्टात तुमच्यावर खटला हरलात, तर तुमचं घर, कार, प्लॉट, बँक खातं, सोने अशा तुमच्या मालमत्तेवर बँक जप्तीची कारवाई करू शकते.

भारतीय कायद्यानुसार हे सर्व प्रकरण “Indian Contract Act 1872” च्या कलम 126, 128, 133, 139 अंतर्गत येते. तसेच नवीन BNS 2023 अंतर्गत कलम 318 व 319 प्रमाणे फसवणूक व ओळख लपवून फसवणुकीचे प्रकरणही लागू होऊ शकते.

✅ जामीनदार होणं ही केवळ एक सहानुभूती नव्हे, तर आर्थिक जोखीम आणि कायदेशीर जबाबदारी आहे. म्हणून, जामीनदार होण्याआधी संबंधित व्यक्तीची परतफेडीची क्षमता, त्यांची आर्थिक शिस्त आणि कायदेशीर दायित्व नीट समजून घेणे अत्यावश्यक आहे.

🛑 विश्वास ठेवा, पण जामीनदार होण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune