पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा नाईट रायडर बारवर हल्ला, 8 अटकेत
पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा नाईट रायडर बारवर हल्ला, 8 अटकेत
पनवेलच्या आजिवली येथील ‘नाईट रायडर लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार’वर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला करत काचा फोडल्या व बार बंद करण्याची धमकी दिली. पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे.
सायली मेमाणे
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : पनवेल तालुक्यातील आजिवली परिसरात रविवारी उशिरा रात्री मोठा गोंधळ उडाला, जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी ‘नाईट रायडर लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार’वर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यादरम्यान बारची काचफोड करण्यात आली, दरवाजांवर लाकडी काठ्यांनी प्रहार करण्यात आले आणि स्टाफला धमकावून बार बंद करण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आठ मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
फिर्यादी रामाण्णा कळप्पा शेट्टी (वय ५१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास हे घटना घडली. त्यांनी सांगितले की, त्या रात्री अचानक 15-20 मनसे कार्यकर्ते बारसमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राजसाहेबांचा विजय असो, बार तोडा, बार फोडा” अशा घोषणा देत त्यांनी बारच्या काचा फोडल्या. यावेळी त्यांनी दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आणि दरवाजे व बोर्डवर लाकडी काठ्यांनी प्रहार केला.
या हल्ल्यानंतर आरोपी कार्यकर्त्यांनी बारमालक आणि कर्मचाऱ्यांना धमकी देत बार तत्काळ बंद करण्यास भाग पाडले. या धक्कादायक घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरीही, बारमधील काचांचे व आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 329(1), 189(2), 191(1)(2)(3), 324(5), 125, 352, 351(3), तसेच IPC कलम 441, 143, 147, 148, 427, 336, 504, 506 अंतर्गत गुन्हा क्रमांक २०२/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी मनसे महानगर प्रवक्ते योगेश चिल्ले, राहुल चव्हाण, संजय मुरकुटे, किरण गुरव, अक्षय हाके यांच्यासह आठ जणांना अटक केली असून, त्यांना पनवेल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेच्या गंभीरतेला लक्षात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.
या प्रकरणामुळे पनवेल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवला आहे. स्थानिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा घटनांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.