यवतमाळ बसस्थानकावर महिला कंडक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न, नागरिकांच्या धाडसाने बचाव
यवतमाळ बसस्थानकावर महिला कंडक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न, नागरिक आणि पोलिसांच्या तत्परतेने जीव वाचला
यवतमाळच्या पुसद यवतमाळ बस स्टँड परिसरात महिला कंडक्टरने झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरिक आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचला. जाणून घ्या संपूर्ण घटना.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑगस्ट २०२५ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्टँड परिसरात महिला कंडक्टरने झाडावर चढून दोरीच्या साह्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचा ताफा त्वरित घटनास्थळी दाखल झाला. नागरिकांच्या मदतीने महिला कंडक्टरला सुरक्षित खाली आणण्यात आले. विशेषतः बसस्थानक परिसरातील सलमान नावाच्या ऑटोचालकाने झाडावर चढून महिलेचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी या महिला कंडक्टरवर एका शाळकरी मुलीला मारहाण केल्याचा आरोप होता. यासंदर्भात तिच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये एनसी दाखल झाली होती. या प्रकरणामुळे ती मानसिक तणावाखाली होती आणि त्याच तणावातून तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी महिलेचे समुपदेशन केले असून पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
अशा घटनांमुळे मानसिक तणाव आणि नैराश्य यांसारख्या समस्यांकडे समाजाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित होते. नागरिकांनी आणि पोलिसांनी दाखवलेल्या तात्काळ प्रतिसादामुळे एक मौल्यवान जीव वाचला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.