महाराष्ट्र काँग्रेसची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या
महाराष्ट्र काँग्रेसची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या
महाराष्ट्र काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या प्रचंड नुकसानीकडे लक्ष वेधले आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
सायली मेमाणे
पुणे २१ ऑगस्ट २०२५ :महाराष्ट्रात सलग काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागांत पुरस्थिती निर्माण केली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उभी पिके वाहून गेली आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे जवळपास १५ लाख एकरांहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, भात, ऊस, मका आणि भाजीपाला यांसारखी उभी पिके वाहून गेली आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांना तातडीने शासकीय मदतीची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिले. त्यांनी म्हटले की, “राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. हे वेळेवर झाले नाही, तर शेतकरी मोठ्या संकटात सापडतील.”
काँग्रेसने राज्य सरकारला तातडीने केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याचीही मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळू शकते. मात्र, त्यासाठी राज्य सरकारने तातडीने अहवाल पाठवणे आवश्यक आहे. सपकाळ यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “शेतकरी संकटात असताना सरकारने वेळ न दवडता तत्परतेने मदत द्यावी.”
अनेक शेतकऱ्यांचे शेतात उभे पिक पूर्णपणे वाहून गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. खरीप हंगामावर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याबाबतही संभ्रम कायम आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे आवश्यक असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटामुळे हवालदिल झाले आहेत. काँग्रेसने केलेली मागणी ही शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाशी निगडित असल्याने महत्त्वाची ठरते. आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी कितपत तत्परतेने निर्णय घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.