गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी मोठी खुशखबर, मंडप शुल्क माफ

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी मोठी खुशखबर, मंडप शुल्क माफ
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ महापालिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी मंडप शुल्क माफ केले. उत्सव मंडळांनी समाधान व्यक्त केले.
सायली मेमाणे
पुणे २१ ऑगस्ट २०२५ : ठाणे – गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ महापालिकांकडून आकारले जाणारे मंडप शुल्क यंदा माफ करण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेकडो सार्वजनिक उत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी मंडळांना मंडप उभारणीसाठी स्थानिक प्रशासनाकडे शुल्क भरावे लागत होते. मात्र यावर्षी विविध मंडळांनी खासदार डॉ. शिंदे यांच्याकडे या शुल्काबाबत तक्रार आणि मागणी केली होती. त्यांनी त्वरित पुढाकार घेत संबंधित महापालिका प्रशासनाला मंडप शुल्क रद्द करण्यासाठी पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीला प्रशासनाने मान्यता दिली आहे.
यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांनी आनंद व्यक्त केला असून, खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले आहेत. स्थानिक पातळीवरही या निर्णयाचे स्वागत केले जात असून, यामुळे उत्सव अधिक भव्य व आनंदमय पद्धतीने साजरे करण्यासाठी मंडळांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
हा निर्णय आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मंडप शुल्क रद्द झाल्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव अधिक जोमात पार पाडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter