ललित मोदींचा सल्ला : “एकदिवसीय क्रिकेट थांबवा, ऑलिंपिकवर लक्ष द्या” – ICC ला अजब प्रस्ताव

ललित मोदींचा सल्ला : “एकदिवसीय क्रिकेट थांबवा, ऑलिंपिकवर लक्ष द्या” – ICC ला अजब प्रस्ताव
आयपीएलचे जनक ललित मोदी यांनी ICC ला एकदिवसीय क्रिकेट बंद करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी कसोटी आणि टी-20 वर भर देण्याची, तसेच ऑलिंपिकमध्ये क्रिकेटला प्राधान्य देण्याची सूचना केली आहे.
सायली मेमाणे
पुणे २५ ऑगस्ट २०२५ : भारतीय क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणणारे माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. क्रिकेट प्रशासन आणि स्पर्धांचे स्वरूप बदलण्याबाबत नेहमी वेगळे विचार मांडणारे मोदी यांनी यावेळी थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपुढे (ICC) मोठा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांचा सल्ला असा आहे की, एकदिवसीय क्रिकेट थांबवून कसोटी आणि टी-20 सामन्यांना प्राधान्य द्यावे तसेच ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करावे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत झालेल्या चर्चेत ललित मोदी यांनी क्रिकेटच्या भविष्यासंबंधी आपले विचार स्पष्टपणे मांडले. ते म्हणाले की, “जर कसोटी क्रिकेट दिवसा खेळवले गेले, तर त्यात प्रेक्षकांचा रस कमी होण्याची शक्यता आहे. माझा ठाम विश्वास आहे की एकदिवसीय क्रिकेट पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्याऐवजी कसोटी आणि टी-20 स्वरूपात द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या पाहिजेत.”
मोदींच्या म्हणण्यानुसार, आजच्या काळात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये आठ-आठ तास बसून सामना पाहण्याची क्षमता किंवा आवड राहिलेली नाही. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांना कमी प्रतिसाद मिळतो. त्यांनी सुचवले की, कसोटी सामने दुपारी दोन वाजता सुरू करायला हवेत, ज्यामुळे लोकांना सायंकाळी सामन्याचा आनंद घेता येईल.
याशिवाय, मोदी यांनी जागतिक स्पर्धांच्या स्वरूपाबाबतही आपले मत मांडले. ते म्हणाले की, “विश्वचषकांची संख्या कमी करण्यात यावी आणि त्याऐवजी ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विश्वचषक दर चार वर्षांनी होतो, त्यामुळे त्यात बदल करण्याऐवजी जगभरात कसोटी विश्व मालिका आयोजित केली जावी. एकदिवसीय सामन्यांवर पैसा खर्च करण्यात काही एक अर्थ नाही.”
ललित मोदी यांचे नाव भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळ्या कारणासाठी सदैव स्मरणात राहील – त्यांनी भारतात आयपीएलची सुरुवात केली. आज आयपीएल ही जगातील सर्वात मोठी, लोकप्रिय आणि श्रीमंत क्रिकेट लीग बनली आहे. या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेटने आर्थिक आणि तांत्रिक दोन्ही बाबतीत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे मोदींचे मत आणि त्यांचे प्रस्ताव क्रिकेट प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जाण्याची शक्यता आहे.
जागतिक स्तरावर क्रिकेट अधिक लोकप्रिय करण्यासाठी आयसीसी सतत प्रयत्नशील आहे. मात्र, एकदिवसीय स्वरूपाचे भविष्य नेहमीच प्रश्नचिन्हाखाली राहिले आहे. सध्याच्या काळात कसोटी आणि टी-20 या दोनच स्वरूपांना जास्त प्राधान्य दिले जात आहे. मोदींच्या विधानामुळे क्रिकेटमधील बदलांच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
क्रिकेट चाहत्यांमध्ये यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते, एकदिवसीय क्रिकेटचाच रोमांच वेगळा आहे, ज्याला हटवणे चुकीचे ठरेल. तर अनेकांचा विश्वास आहे की, भविष्यात फक्त कसोटी आणि टी-20 हाच क्रिकेटचा गाभा राहणार आहे. अशा परिस्थितीत ललित मोदींचा सल्ला योग्य ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter