पुणे विभागात असंसर्गजन्य आजारांवरील तपासणीत धक्कादायक निष्कर्ष – लाखो नागरिक धोक्यात
पुणे विभागात असंसर्गजन्य आजारांवरील तपासणीत धक्कादायक निष्कर्ष – लाखो नागरिक धोक्यात
पुणे विभागातील सहा महिन्यांच्या तपासणीत 16 लाखांहून अधिक नागरिकांची चाचणी झाली असून, 95 हजारांमध्ये असंसर्गजन्य उच्च रक्तदाब तर 41 हजारांमध्ये मधुमेह आढळला आहे. हा आकडा सार्वजनिक आरोग्यासाठी चिंताजनक इशारा ठरत आहे.
सायली मेमाणे
पुणे २६ ऑगस्ट २०२५ : पुणे विभागात असंसर्गजन्य आजारांवरील तपासणीत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत 16 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून 95 हजार नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे, तर तब्बल 41 हजार नागरिक मधुमेहग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी हा गंभीर इशारा असून, वाढत्या जीवनशैलीशी निगडित आजारांचे संकट किती तीव्र होत आहे हे या निष्कर्षांवरून स्पष्ट होते.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 55 हजार रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे. पुण्यातील 27 हजार आणि साताऱ्यातील 11 हजार नागरिकांमध्ये देखील उच्च रक्तदाबाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. दुसरीकडे, 14 लाख तपासण्यांपैकी 41 हजार लोक मधुमेहग्रस्त असल्याचे आढळले आहे. हे आकडे असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या प्रमाणाची जाणीव करून देतात. रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा थेट परिणाम हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या गंभीर आजारांवर होऊ शकतो. त्यामुळे योग्यवेळी तपासणी, आहार नियंत्रण आणि जीवनशैलीतील बदल गरजेचे ठरत आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चुकीची जीवनशैली, असंतुलित आहार, शारीरिक श्रमांचा अभाव आणि मानसिक तणाव हे असंसर्गजन्य आजारांच्या वाढीमागील प्रमुख घटक आहेत. फास्ट फूड, जंक फूड, कमी झोप आणि वाढलेला मोबाईल व संगणकाचा वापर यामुळे तरुण पिढीत देखील उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातसुद्धा हे आजार आता सर्वसामान्य होत चालले आहेत, ही चिंतेची बाब आहे.
सरकार आणि आरोग्य विभागाने याबाबत अनेक जनजागृती मोहीमा राबवल्या आहेत. परंतु केवळ मोहिमा पुरेशा नाहीत, तर नागरिकांनी स्वतःहून आरोग्य तपासणीसाठी पुढे यायला हवे. नियमित तपासणीद्वारे या आजारांचे लवकर निदान होऊ शकते आणि योग्य उपचार सुरू करता येतात. विशेषतः ३० वर्षांवरील नागरिकांनी वर्षातून किमान एकदा रक्तदाब आणि मधुमेह तपासणी करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पुणे विभागातील या तपासणीतून मिळालेली आकडेवारी समाजासाठी एक गंभीर धक्का आहे. लाखो लोक धोक्याच्या छायेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास भविष्यात या आजारांचे संकट अधिक गंभीर रूप धारण करू शकते. नागरिकांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, ध्यान-योगा आणि तणावमुक्त जीवनशैली स्वीकारणे गरजेचे आहे. याचबरोबर सरकारी स्तरावरही आरोग्य तपासणी केंद्रांची उपलब्धता वाढवून, मोफत तपासण्यांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे ठरणार आहे.