तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट; चाहत्यांना दिला नव्या सुरुवातीचा संदेश
तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट; चाहत्यांना दिला नव्या सुरुवातीचा संदेश
चेंगराचेगरी प्रकरणानंतर 3 महिन्यांनी RCB ने सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली. चाहत्यांसाठी नव्या सुरुवातीचा संदेश देताना संघाने ‘RCB CARES’ च्या माध्यमातून कर्नाटकचा अभिमान जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
सायली मेमाणे
पुणे २८ ऑगस्ट २०२५ :तीन महिन्यांनंतर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या सोशल मिडियावर चाहत्यांसाठी पहिली पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट चेंगराचेगरी प्रकरणानंतर आली असून संघाने नव्याने सुरुवात करण्याचा संदेश दिला आहे.
RCB ने 18 वर्षांनंतर इंडियन प्रिमियर लीग 2025 ची ट्राॅफी जिंकली होती. मात्र विजय साजरा करताना झालेल्या चेंगराचेगरी प्रकरणामुळे संघाला मोठा भावनिक आणि आर्थिक झटका बसला. स्टेडियममध्ये उत्साह साजरा करण्याच्या दरम्यान 11 जणांचा जीव गेला आणि अनेकांना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर संघावर दंडही ठोठावण्यात आला.
या प्रकरणामुळे मागील तीन महिन्यांत RCB च्या मॅनेजमेंटने सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट केली नव्हती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा होती. आता या तीन महिन्यांनंतर शेअर झालेल्या पोस्टमध्ये संघाने चाहत्यांसाठी हृदयस्पर्शी संदेश दिला आहे.
RCB च्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “प्रिय १२व्या सैनिक सैन्या, हे आमचे तुम्हाला हार्दिक पत्र आहे! शांतता ही अनुपस्थिती नव्हती, तर ती दुःखाची गोष्ट होती. ही जागा एकेकाळी ऊर्जा, आठवणी आणि क्षणांनी भरलेली होती ज्याचा तुम्ही सर्वाधिक आनंद घेतला होता. पण ४ जूनने सर्व बदलून टाकले. त्या दिवसाने आमची मने तोडली आणि तेव्हापासूनची शांतता ही जागा टिकवून ठेवण्याचा आमचा मार्ग बनली आहे.”
पोस्टमध्ये पुढे सांगितले आहे की, “त्या शांततेत आम्ही दुःखी आहोत, ऐकत आहोत, शिकत आहोत. आणि हळूहळू आम्ही फक्त प्रतिसादापेक्षा काहीतरी अधिक निर्माण करू लागलो आहोत. ज्यावर आम्ही खरोखर विश्वास ठेवतो.” अशा प्रकारे 𝗥𝗖𝗕 𝗖𝗔𝗥𝗘एस जन्माला आले.
RCB CARES ही संकल्पना संघाच्या चाहत्यांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना बरे करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तयार करण्यात आली. संघाने म्हटले आहे की, आज ते उत्सवाने नाही तर काळजीने परतले आहेत, आणि चाहत्यांसोबत एकत्र पुढे चालत, कर्नाटकचा अभिमान टिकवण्याचा संकल्प करत आहेत.
या पोस्टनंतर RCB च्या चाहत्यांनी सोशल मिडियावर द्रुत प्रतिसाद दिला आहे. संघाबद्दल प्रेम व्यक्त करत हजारो लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स झाले आहेत. चाहत्यांनी RCB टीमसाठी भरभरून समर्थन व्यक्त केले आहे, तसेच संघाच्या खेळाडूंबद्दलही प्रेम व्यक्त केले आहे.
या पोस्टमुळे RCB चाहत्यांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाली असून संघाच्या भावनिक पुनरुज्जीवनाची सुरुवात झाली असल्याचे दिसून येते.