माता नव्हे वैरीण! छत्रपती संभाजीनगरात आईने नवजात बालकाला कचऱ्यात फेकले
माता नव्हे वैरीण! छत्रपती संभाजीनगरात आईने नवजात बालकाला कचऱ्यात फेकले
छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक घटना! २४ वर्षीय महिलेनं नवजात बालकाला गोणीत गुंडाळून कचऱ्यात फेकलं. कुत्र्यांच्या हल्ल्यातून व बसखाली आल्यावरही नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाचे प्राण वाचले.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑगस्ट २०२५ : छत्रपती संभाजीनगरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. २४ वर्षीय निर्दयी आईनेच स्वतः जन्म दिलेल्या नवजात बाळाला गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. पहाटेच्या गारठ्यात त्या गोणीभोवती भटक्या कुत्र्यांनी दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला, एवढेच नव्हे तर ती गोणी एकदा बसखालीही आली. तरीही नागरिकांच्या सतर्कतेमुळे बालकाचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीपासून विभक्त राहणारी २४ वर्षीय महिला गरोदरपणातच एकटी राहत होती. कुटुंबापासून हा प्रकार लपवण्यासाठी तिने घरातच बाळाला जन्म दिला. जन्मानंतर अवघ्या दोन तासातच निर्दयीपणे बाळाला गोणीत गुंडाळले आणि पुंडलिकनगर येथील गजानन महाराज मंदिराजवळील कचऱ्यात टाकले.
पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून कुत्र्यांचा विचित्र गोंधळ ऐकला. गोणीतून आवाज येत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धाव घेतली. तेव्हा दिसले की, नवजात बाळाला कुत्र्यांनी लचके तोडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान तीच गोणी एकदा बसखालीही आली होती. पण चमत्कारच म्हणावा लागेल की, बाळाला किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी त्याचे प्राण वाचले.
घटनास्थळावरून बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेत तिला अटक केली आहे. चौकशीत तिने हे अमानुष कृत्य केल्याची कबुली दिली. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात संताप व्यक्त होत आहे. समाजमाध्यमांवर नागरिकांनी या प्रकाराला “माणुसकीला काळिमा फासणारी घटना” असे म्हणत तीव्र निषेध नोंदवला आहे.