पुण्यात डीजे आणि डॉल्बीला बंदी घालण्याची कलावंत ढोल ताशा पथकांची मागणी
पुण्यात डीजे आणि डॉल्बीला बंदी घालण्याची कलावंत ढोल ताशा पथकांची मागणी
पुण्यातील कलावंत ढोल ताशा पथक आणि मराठी कलाकारांनी सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डॉल्बी व डीजे साउंडवर बंदी घालावी अशी मागणी केली. यासाठी रविवारी विशेष स्वाक्षरी मोहीम होणार असून निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
सायली मेमाणे
पुणे १२ सप्टेंबर २०२५ : पुण्यात सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डॉल्बी आणि डीजे संस्कृतीविरोधात आता कलावंत ढोल ताशा पथक आणि मराठी कलाकार एकवटले आहेत. पारंपरिक वाद्यांचा ठेका आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या कलाकारांकडून एक विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्सवांमध्ये डीजे साउंड आणि डॉल्बीमुळे केवळ ध्वनीप्रदूषण वाढत नाही तर पारंपरिक कला प्रकारांना मागे टाकले जात आहे. पुण्यातील ढोल ताशा पथकातील कलाकारांनी या मुद्द्यावर आवाज उठवला असून सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डीजेला बंदी घालावी अशी ठाम भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी रविवारी शहरात मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी होणार असून, ही मोहिम सांस्कृतिक चळवळीचं रूप धारण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कलाकार सौरभ गोखले यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की, “उत्सव म्हणजे आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा मार्ग आहे. मात्र, डीजे आणि डॉल्बीमुळे या उत्सवांचा गाभा बदलतो आहे. त्यामुळेच आम्ही या मोहिमेतून प्रशासन आणि सरकारला या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती करत आहोत.”
येत्या रविवारी आयोजित या स्वाक्षरी मोहिमेत हजारो नागरिक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या मोहिमेत संकलित करण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या आणि निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या मागणीला स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध सांस्कृतिक मंडळांचंही समर्थन मिळत आहे.
डॉल्बी आणि डीजे यांमुळे केवळ पारंपरिक कलांना धक्का पोहोचतो असे नाही, तर आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जास्त ध्वनीमुळे लहान मुलं, वृद्ध आणि रुग्णांना त्रास होतो. तसेच ध्वनीप्रदूषणामुळे पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
पुण्यातील या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळाल्यास राज्यभरात डीजे संस्कृतीविरोधात जनजागृती वाढेल आणि पारंपरिक ढोल-ताशा वादनाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.