महादेवी हत्तीणी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उच्चस्तरीय समितीकडे, कोल्हापुरात परतण्याची शक्यता

महादेवी हत्तीणी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उच्चस्तरीय समितीकडे, कोल्हापुरात परतण्याची शक्यता
महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय उच्चस्तरीय समितीकडे सोपवला आहे. नांदणी मठाकडून दाखल अर्जामुळे हत्तीण पुन्हा कोल्हापुरात परतण्याची शक्यता वाढली आहे.
सायली मेमाणे
पुणे १३ सप्टेंबर २०२५ : कोल्हापूर : नांदणी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या प्रकरणाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा महत्वाचे वळण मिळाले. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवण्याबाबत कोणताही थेट निर्णय झाला नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील अंतिम निर्णय उच्चस्तरीय समितीकडे सोपवला आहे. त्यामुळे आता या समितीचा अहवाल आणि शिफारशींवरच हत्तीणीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
महादेवी हत्तीणीचे कोल्हापुराशी असलेले नाते आणि स्थानिकांच्या भावना या प्रकरणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदणीच्या स्वस्तश्री जिनसेन पठारक भट्टाचार्य मठाकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्याची मागणी करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात परतण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे.
कोल्हापुरातील नागरिक आणि भाविक यंदाच्या नवरात्रोत्सवात महादेवी हत्तीणी मठात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. कारण, महादेवी हत्तीणी धार्मिक कार्यक्रमांशी, परंपरांशी आणि स्थानिकांच्या आस्थेशी जोडलेली आहे. अनेक वर्षांपासून मठाशी निगडित असल्याने तिच्या अनुपस्थितीमुळे परिसरात भावनिक पोकळी जाणवत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता हा विषय आणखी गंभीर झाला असून, समितीच्या अहवालावर सर्वांचे लक्ष लागले आहे. समिती हत्तीणीच्या आरोग्यस्थिती, निवासस्थान, व्यवस्थापन आणि धार्मिक परंपरांशी असलेला संबंध यांचा सखोल अभ्यास करून अंतिम निर्णय घेईल.
नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने कोल्हापूरकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महादेवी हत्तीणी मठात पुन्हा परतल्यास भाविकांच्या आनंदाला पारावार उरणार नाही, असे वातावरण आहे. दुसरीकडे, प्राणीसंवर्धन आणि कायदेशीर नियमांचे पालन या दोन्ही गोष्टी समितीसमोर तितक्याच महत्त्वाच्या असणार आहेत.
या प्रकरणामुळे स्थानिक स्तरावर धार्मिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर असा त्रिसूत्री वाद उभा राहिला आहे. भाविकांच्या भावनांचा आदर राखून तसेच प्राणीसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून संतुलित निर्णय घेणे हीच समितीसमोरची मोठी कसोटी असणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter