अजित पवारांनी IPS अंजना कृष्णा यांना धमकावल्याप्रकरणी ‘सुपर कॉप’ ज्युलिओ रिबेरोंची सडकून टीका

0
अजित पवारांनी IPS अंजना कृष्णा यांना धमकावल्याप्रकरणी ‘सुपर कॉप’ ज्युलिओ रिबेरोंची सडकून टीका

अजित पवारांनी IPS अंजना कृष्णा यांना धमकावल्याप्रकरणी ‘सुपर कॉप’ ज्युलिओ रिबेरोंची सडकून टीका

IPS अंजना कृष्णा यांना धमकावल्याच्या वादावर ‘सुपर कॉप’ ज्युलिओ रिबेरोंनी अजित पवारांवर सडकून टीका केली. कायदे आवडत नसतील तर बदलावे, पण अधिकारी धमकावणे निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सायली मेमाणे

पुणे १३ सप्टेंबर २०२५ : मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता ‘सुपर कॉप’ म्हणून ओळखले जाणारे माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांनी सडकून टीका केली आहे. रिबेरो म्हणाले की, जर मंत्र्यांना कायदे आवडत नसतील, तर ते बदलण्याचा अधिकार सरकारकडे आहे. मात्र, कायद्याचे पालन करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला धमकावणे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे.

माजी पोलीस अधिकारी डी. शिवानंदन यांच्या ‘द ब्रह्मास्त्र अनलीश्ड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना रिबेरो यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या केवळ सरकारी नियम आणि कायद्यांच्या चौकटीत राहून काम करत होत्या. अशा वेळी त्यांच्यावर राजकीय दबाव आणणे किंवा कारवाई थांबवण्यास सांगणे हे लोकशाहीस घातक आहे. कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे आणि त्याचे पालन करणे हे सर्वांनाच बंधनकारक आहे, असे रिबेरो यांनी ठामपणे सांगितले.

या प्रकरणाचा उगम एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (DSP) अंजना कृष्णा यांच्यात फोनवर संभाषण होत असल्याचे ऐकू येते. त्यामध्ये अजित पवार या अधिकाऱ्यांना, “मी उपमुख्यमंत्री बोलतोय, ही ॲक्शन थांबवा. तुमची हिंमत कशी झाली?” अशा स्वरूपाच्या धमक्यांचे उच्चार करताना ऐकू येतात. या प्रसंगामुळे राजकीय वर्तुळात आणि जनतेत संताप व्यक्त होत आहे.

अंजना कृष्णा या 2022-23 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून त्यांची सचोटी, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा याबाबत राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली होती, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळेच अजित पवारांनी थेट हस्तक्षेप करून त्यांना धमकावल्याच्या घटनेने मोठा वाद निर्माण केला आहे.

या प्रकरणामुळे विरोधी पक्षांनीही अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या कारभारात मंत्र्यांकडून अशाप्रकारे हस्तक्षेप होतो का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. अंजना कृष्णा यांच्यासोबत घडलेला प्रसंग हा केवळ एका अधिकाऱ्याशी संबंधित नाही, तर तो महाराष्ट्रातील प्रशासनातील पारदर्शकता आणि कायद्याच्या अंमलबजावणीशी थेट संबंधित आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

ज्युलिओ रिबेरो यांनी आपल्या भाषणात म्हटले की, हे प्रकरण केवळ अजित पवारांसाठी धडा नाही, तर महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांसाठी एक शिकवण आहे. कायद्याचा सन्मान करणे आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यात स्वतंत्रपणे काम करू देणे ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

पंजाबमध्ये दहशतवादाविरुद्ध कठोर लढा देऊन आपले धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखले जाणारे ज्युलिओ रिबेरो हे थेट बोलणारे आणि परखड मत मांडणारे अधिकारी मानले जातात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या घटनेमुळे अजित पवार अडचणीत आले असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed