Wagholi Police Bust Cyber Fraud: फ्लिपकार्टवरून मोबाईल खरेदी करणारे परराज्यातील हॅकर्स अटकेत
फ्लिपकार्टवरून मोबाईल खरेदी करणारे परराज्यातील हॅकर्स अटकेत
Wagholi Cyber Crime News: वाघोली पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने मोठी कारवाई करत फ्लिपकार्टवरून क्रेडिट कार्ड हॅक करून लाखोचे मोबाईल खरेदी करणाऱ्या परराज्यातील तीन सायबर चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी ४५ मोबाईल फोन जप्त केले.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे १७ सप्टेंबर २०२५ : पुणे शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना वाघोली पोलीस स्टेशनच्या सायबर शाखेने मोठी कारवाई करत परराज्यातील सायबर चोरट्यांना जेरबंद केले आहे. आरोपींनी WhatsApp वरून APK फाइल पाठवून पीडित व्यक्तीचे व्हॉट्सअॅप आणि क्रेडिट कार्ड डिटेल्स हॅक केले होते. या माहितीचा वापर करून त्यांनी फ्लिपकार्टवरून मोबाईल फोन खरेदी केली होती. अखेर तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याचा माग काढत ही चतुराई उघडकीस आणली आणि लाखो रुपयांचे मोबाईल फोन जप्त करण्यात यश मिळवले.
भारतीय सेना दलातील करिमुल खुसममुद अली इस्लाम (वय ३२, मूळ रा. घुगूबारी, बरपेटा, आसाम, सध्या रा. वाघोली, पुणे) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे क्रेडिट कार्ड हॅक करून तब्बल १,०६,८८५ रुपयांचे मोबाईल फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करण्यात आले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा र.नं. ४७६/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३१९(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पथकाने तपास सुरू केला असता मोबाईल फोनची डिलीव्हरी वाघोली येथील केसनाथ रोडवरील प्रिन्स मेडिकल येथे झाली असल्याचे निष्पन्न झाले. फ्लिपकार्ट कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीवरून डिलीव्हरी रिसीव्ह करणाऱ्या व्यक्तीचा फोटो पोलिसांच्या हातात लागला. त्यावरून वाघोली, केसनाथ, बकोरी, खराडी आणि चंदननगर भागात शोध घेण्यात आला. अखेर त्या व्यक्तीचे नाव अस्लम खान असल्याचे समजले. तो काळुबाईनगर, वाघोली येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी छापा टाकला.
तेथे पोलिसांना दोन संशयित आरोपी आढळून आले. त्यांची नावे अस्लम मोफिद खान (वय २२, मूळ रा. कैमुर, बिहार, सध्या रा. वाघोली, पुणे) आणि आदिब रिझवान खान (वय २१, मूळ रा. सुरत, गुजरात) अशी आहेत. तपासात समोर आले की आरोपी आदिब खान हा सुरतहून विमानाने येऊन साथीदार अस्लम खानच्या मदतीने हॅक केलेल्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केलेल्या मोबाईल फोनची डिलीव्हरी घेत असे आणि हे मोबाईल पुढे सुरत येथे नेऊन फरहान इब्राहीम उनवाला (वय २५, रा. सुरत, गुजरात) याच्याकडे विकले जात होते. पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींकडून तब्बल ४५ मोबाईल फोन, किंमत सुमारे १२ लाख रुपये, जप्त केले आहेत.
या कारवाईत पोलिस निरीक्षक आसाराम शेटे, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे तसेच सायबर पथकातील रमेश साबळे, किरण अब्दागीरे, विष्णु सरवदे, सतिश बिरादार आणि वृंदाविनी चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण कारवाई ही अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की WhatsApp सारख्या मेसेजिंग अॅपवरून येणाऱ्या अनोळखी APK फाईल्स डाऊनलोड करणे किती धोकादायक ठरू शकते. आरोपी या तंत्राचा वापर करून पीडितांचे बँकिंग आणि क्रेडिट कार्ड डिटेल्स हॅक करून लाखोंची फसवणूक करतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या फाईल्सबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाघोली पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा सायबर गुन्हेगारी रॅकेट उघडकीस आला असून, पुढील तपास सुरू आहे.