पिंपरीत धक्कादायक घटना: झोपेच्या 10 गोळ्या खाल्लेल्या महिलेला मदत करण्याऐवजी सुरक्षा रक्षकाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

0
पिंपरीत धक्कादायक घटना: झोपेच्या 10 गोळ्या खाल्लेल्या महिलेला मदत करण्याऐवजी सुरक्षा रक्षकाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

पिंपरीत धक्कादायक घटना: झोपेच्या 10 गोळ्या खाल्लेल्या महिलेला मदत करण्याऐवजी सुरक्षा रक्षकाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

पिंपरीतील मारूंजी येथे झोपेच्या 10 गोळ्या घेतल्यामुळे अस्वस्थ झालेल्या महिलेवर मदतीसाठी आलेल्या सुरक्षा रक्षकानेच अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सायली मेमाणे

पुणे १८ सप्टेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवड परिसरातील मारूंजी येथे घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपेच्या 10 गोळ्या खाल्ल्यामुळे अस्वस्थ झालेल्या 46 वर्षीय महिलेनं आपल्या घरमालकाला मदतीसाठी संपर्क साधला. मात्र, मदतीसाठी पाठवलेल्या सुरक्षा रक्षकानेच तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रक्षक फरार झाला आहे.

घटनेची माहिती अशी की, 26 जुलै रोजी रात्री पीडित महिलेने झोप येण्यासाठी एकावेळी 10 गोळ्या घेतल्या. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले आणि जीवाला धोका असल्याची भीती वाटू लागली. या अवस्थेत महिलेने आपल्या घरमालकाला मेसेज करून परिस्थितीची माहिती दिली. घरमालकाने तिला तात्काळ धीर देत रुग्णवाहिका पाठविण्याची खात्री दिली. तसेच, तातडीने मदतीसाठी इमारतीतील सुरक्षा रक्षक गजानन याला तिच्याकडे पाठवले.

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक पीडितेच्या घरात पोहोचला. महिला त्या वेळी बेशुद्ध अवस्थेत बेडरूममध्ये पडलेल्या होत्या. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पाहिले की, मदतीसाठी आलेल्या सुरक्षा रक्षकानेच तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. धक्क्यातून सावरत महिलेने तत्काळ त्याला ढकलून बाहेर हाकलून दिले.

घटनेनंतर पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जाच्या चौकशीनंतर हिंजवडी पोलिसांनी सुरक्षा रक्षक गजानन याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत तपास सुरू केला आहे.

ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. कारण मदतीसाठी बोलावलेल्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचा विश्वासघात होणे हे धक्कादायक मानले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पीडित महिलेनं 16 सप्टेंबर रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद नोंदवली. त्यानंतर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिक गतीमान करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरक्षा रक्षकाचा लवकरच शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल.

ही घटना महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. नागरिकांनी संकटाच्या प्रसंगी योग्य प्रकारे मदत मागताना अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *