Vijay Rally Stampede: करूरमध्ये 39 मृत्यू; चेंगराचेंगरीनंतर गर्दीचे भयानक दृश्य
Vijay Rally Stampede: करूरमध्ये 39 मृत्यू; चेंगराचेंगरीनंतर गर्दीचे भयानक दृश्य
तमिळनाडूतील करूरमध्ये अभिनेते विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. 39 जणांचा मृत्यू, 67 जखमी, चपलांचा खच आणि फाटलेले कपडे अशा भयानक दृश्याचे चित्र.
सायली मेमाणे
पुणे २८ सप्टेंबर २०२५ : शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूत करूरमध्ये अभिनेते विजय यांच्या रॅलीत भयंकर चेंगराचेंगरी झाली. सभेसाठी अंदाजे 30 हजार नागरिक उपस्थित राहणार होते, मात्र प्रत्यक्षात 60 हजारांहून अधिक नागरिक सभास्थळी आले. विजय यांचं आगमन झाल्यानंतर भाषण सुरू होताच गर्दीमध्ये दहशत निर्माण झाली आणि अनेक जण एकमेकांवर कोसळले. या दुर्दैवी घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 17 महिला, 13 पुरुष, 4 मुलं आणि 5 मुलींचा समावेश आहे. मृतदेहांची 30 शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले.
जखमींमध्ये 26 जणांना ओपीडीमध्ये उपचार मिळाले तर 67 जणांना आयपीडीमध्ये दाखल केले गेले. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, तर उर्वरित जखमींना स्थिर प्रकृतीत उपचार सुरू आहेत. घटना घडल्यावर पोलिसांनी करूरच्या प्रतिबंधित क्षेत्रावर वेढा घालून सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद केला.
सभास्थळी अत्यधिक गर्दीमुळे नागरिकांमध्ये धावपळ सुरू झाली. पळापळीत अनेक जण एकमेकांवर कोसळले, काहीजण बेशुद्ध पडले. जखमींना तत्काळ करूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी जमाव नियंत्रणासाठी लाठीमारही केला.
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दु:खद घटनेबाबत शोक व्यक्त करत जखमींना लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील आपले संवेदना व्यक्त केले.
सभास्थळी झालेल्या दृश्याचे वर्णन खूपच भयानक होते. जागोजागी चपलांचा खच, फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, फाटलेले झेंडे, कपड्यांचे तुकडे आणि कागदांचा खच पहायला मिळाला. या घटनास्थळी साक्षीदारांनी म्हटले की, मन हेलावून टाकणारे दृश्य होते. गर्दी आणि धडपडीमुळे नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते.
अभिनेते विजय यांच्या लोकप्रियतेमुळे रॅलीत प्रचंड गर्दी जमली होती. अशा परिस्थितीत प्रशासनाने आणि पोलिसांनी योग्य नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक होते, परंतु अचानक झालेल्या धक्क्यामुळे घटना घडली. करूर येथील या दुर्दैवी घटनेमुळे नागरिक आणि राजकारण्यांमध्ये शोक आणि चिंतेची लाट पसरली आहे.