“न्यायाधीश महोदया, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही!”; अरविंद केजरीवाल यांचे खळबळजनक पत्र थेट हितसंबंधांवरच बोट

“न्यायाधीश महोदया, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही!”; अरविंद केजरीवाल यांचे खळबळजनक पत्र थेट हितसंबंधांवरच बोट
अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्तींवर हितसंबंधांचा संघर्ष असल्याचा आरोप करत लिहिलेल्या पत्रामुळे न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित. प्रकरणाने कायदेशीर वर्तुळात खळबळ.
पुणे २७ एप्रिल २०२६ : नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायदेशीर वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी थेट आरोप केला आहे की, संबंधित न्यायाधीशांचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जवळचे संबंध आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या विरोधात केंद्र सरकारची तपास यंत्रणा (सीबीआय) बाजू मांडत असताना आपल्याला न्याय मिळणे अशक्य असल्याचे केजरीवाल यांनी पत्रात नमूद केले आहे.
केजरीवाल यांनी आपल्या आरोपांमध्ये न्यायाधीशांच्या मुलांच्या व्यावसायिक हितसंबंधांचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. “न्यायमूर्ती स्वर्णकांता यांची दोन्ही मुले केंद्र सरकारच्या वकील पॅनेलवर कार्यरत असून, त्यांना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यामार्फत केसेस दिल्या जातात. या कामातून त्यांना कोट्यवधी रुपयांचे मानधन मिळते. ज्या मुलांचे भविष्य आणि आर्थिक हितसंबंध तुषार मेहता यांच्या निर्णयावर अवलंबून आहेत, त्यांच्या मातोश्री मेहतांच्या विरोधात निकाल कसा देऊ शकतात?” असा रोकडा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला असून, हा सरळ-सरळ ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’चा (हितसंबंधांचा संघर्ष) मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
न्यायालयीन प्रक्रियेवरील अविश्वास व्यक्त करताना केजरीवाल यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. “न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्याकडून न्यायाची आशा आता पूर्णपणे मावळली आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी यापुढे स्वतः किंवा आपल्या वकिलामार्फत त्यांच्या न्यायालयासमोर हजर न होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. न्यायाधीशांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या कुटुंबाचे केंद्र सरकारवरील अवलंबित्व यामुळे न्यायालयीन निष्पक्षता धोक्यात आल्याचा दावा त्यांनी या पत्राद्वारे केला आहे.
शेवटी, कायदेशीर लढाईऐवजी आता नैतिक संघर्षाची भूमिका घेत असल्याचे केजरीवाल यांनी सूचित केले आहे. “जेव्हा न्यायव्यवस्थेतून न्यायाची दारे बंद होतात, तेव्हा महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचे अनुसरण करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही,” असे म्हणत त्यांनी आता जनदरबारात जाण्याचे संकेत दिले आहेत. एका मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या नेत्याने उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांवर अशा प्रकारे थेट आणि वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केल्याने आता न्यायालय यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare