बँक नोकरीच्या आमिषाने २४ जणांना १५.७० लाखांचा गंडा
बँक नोकरीच्या आमिषाने २४ जणांना १५.७० लाखांचा गंडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट बँकिंग अकॅडमीने बँकेत नोकरीचे आमिष दाखवत २४ विद्यार्थ्यांना तब्बल १५.७० लाखांचा गंडा घातला. पोलिसांकडे तक्रार नोंद.
सायली मेमाणे
पुणे २५ सप्टेंबर २०२५ : बँकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट अकॅडमीकडून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे उघडकीस आला आहे. जवाहरनगर परिसरातील चेतक घोडा चौक येथे कार्यरत असलेल्या एका बनावट बँकिंग अकॅडमीने तब्बल २४ विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून त्यातून १५ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हा प्रकार ३ फेब्रुवारी ते २३ सप्टेंबर या कालावधीत घडल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. बँकेच्या क्रेडिट विभागात शंभर टक्के नोकरी मिळेल, मासिक पगार २५ ते ३५ हजार रुपयांपर्यंत असेल, तसेच नोकरीनंतर प्रगतीच्या संधी सहज उपलब्ध होतील, अशा गोड बोलांनी इच्छुक विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढण्यात आले. बेरोजगारीमुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि त्याचाच गैरफायदा या बनावट टोळीने घेतल्याचे स्पष्ट होते.
नोकरीच्या नावाने प्रत्येकाकडून वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये रक्कम वसूल केली गेली. प्रशिक्षण, परीक्षा फी, अर्ज प्रक्रिया, वैद्यकीय चाचणी, वेरिफिकेशन अशा विविध कारणांखाली पैसे मागितले गेले. सुरुवातीला काहींना बनावट रिसीट्स, आयडी कार्ड्स देऊन विश्वास संपादन करण्यात आला. काही जणांना इंटरव्ह्यू कॉल लेटर्सही देण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांनंतर नोकरीच्या संधीबाबत विचारणा केली असता टाळाटाळ केली जाऊ लागली आणि शेवटी अकॅडमी बंदच करण्यात आली.
२४ जणांनी एकत्र येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर या फसवणुकीचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत असे आढळले आहे की, आरोपींनी व्यवस्थित ऑफिस उभारले होते, जाहिराती काढल्या होत्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधत विद्यार्थ्यांना आकर्षित केले होते. यामुळे इच्छुकांना हे संपूर्ण प्रकरण अधिकृत वाटत होते.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे की, नोकरीच्या जाहिराती व भरती प्रक्रिया नेहमी शासकीय संकेतस्थळांवर किंवा बँकांच्या अधिकृत पोर्टलवर तपासाव्या. मध्यस्थ अथवा खासगी संस्थांमार्फत नोकरीचे आमिष दिले गेले तर त्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. बेरोजगारीची चिंता असली तरी बनावट व फसवणूक करणाऱ्या टोळ्यांच्या जाळ्यात अडकण्याचे प्रकार टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
सध्या पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. फसवणुकीच्या या प्रकरणामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांबाबत त्वरित तक्रार करावी, ज्यामुळे पुढील फसवणुकीचे प्रकार रोखता येतील.
नोकरीचे गोड आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बनावट बँकिंग अकॅडमीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेरोजगारीच्या काळात मेहनतीचे पैसे गमावल्याने विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संताप पसरला आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.